पुणे : राज्यातील १०९ उमेदवारांची क्रीडा प्रमाणपत्रे बोगस ; १७ उमेदवारांची शासकीय सेवा रद्द करण्याची शिफारस

राज्यभरातील १०९ उमेदवारांनी बोगस क्रीडा प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय नोकरी मिळवल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित १०९ उमेदवारांपैकी १७ जणांची शासकीय सेवा रद्द करण्याची शिफारसही करण्यात आली आहे.

बोगस क्रीडा प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय नोकरी मिळवण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांत उघडकीला आले होते. त्यामुळे क्रीडा प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचा निर्णय क्रीडा विभागाने घेतला. काही महिन्यापूर्वी क्रीडा प्रमाणपत्रासंदर्भात समर्पण योजनाही सादर करण्यात आली होती. त्यात बोगस क्रीडा प्रमाणपत्र, बोगस क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल समर्पित करणाऱ्यांच्या नावाची गोपनीयता बाळगून त्यांच्याविरोधात फौजदारी कारवाई केली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर क्रीडा विभागाने क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल रद्द केलेल्या १०९ उमेदवारांची यादी नुकतीच संकेतस्थळावर जाहीर केली. गृह विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, कृषी विभाग, ग्रामविकास, राज्यकर, विधी व न्याय, वित्त विभाग, जलसंपदा, महसूल व वन अशा विविध विभागांतील पदांवर संबंधित उमेदवार कार्यरत आहेत. संबंधित उमेदवारांनी पॉवरलिफ्टिंग, सॉफ्टबॉल, कयाकिंग, कनोईंग, तलवारबाजी, ट्रम्पोलिन अशा खेळांतील खेळाडू असल्याचे प्रमाणपत्र उमेदवारांकडून सादर करण्यात आले होते.

पोलिस शिपाई, टंकलेखक, कृषी सहायक, कृषिसेवक, शिक्षण सेवक, गटशिक्षणाधिकारी, तलाठी अशा पदांवरील १७ उमेदवारांची शासकीय सेवा रद्द करण्याची शिफारसही क्रीडा विभागाकडून करण्यात आली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply