पुणे : यंदा दहीहंडीला दणदणाट, शहरभर फ्लेक्सबाजी, लाखोंचा खर्च; महापालिका निवडणुकांमुळे इच्छुकांचे शक्तिप्रदर्शन

पुणे : सार्वजनिक सण, उत्सवावर असलेले निर्बंध मागे घेण्यात आल्यानंतर यंदा दहीहंडीचा उत्सव सार्वजनिक स्वरूपात मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येणार आहे. दहीहंडीच्या माध्यमातून आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांकडून शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असून शहरभर दहीहंडी साजरी करणाऱ्या मंडळांनी फ्लेक्स लावले आहेत. सिनेतारकांची उपस्थिती, दहीहंडी पथकांवर देण्यात येणरी बक्षिसे, रोषणाईवर लाखो रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.

करोना संसर्गामुळे गेले दोन वर्षे सार्वजनिक उत्सवांवर निर्बंध होते. राज्य शासनाने सार्वजनिक सणांवरील निर्बंध मागे घेतल्यानंतर यंदा दहीहंडी आणि गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांनी तयारी सुरू केली आहे. दहीहंडी उत्सव येत्या शुक्रवारी (१९ ऑगस्ट) साजरा करण्यात येणार आहे. आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. दहीहंडी आणि गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना भरीव सहाय करण्यासाठी इच्छुक आघाडीवर असून दहीहंडी उत्सवापूर्वी शहरभर फ्लेक्सबाजी करण्यात आली आहे. फ्लेक्सबाजी, चित्रपटसृष्टीतील अभिनेते, अभिनेत्रींची उपस्थिती, उच्च क्षमतेची ध्वनिवर्धक यंत्रणा आणि प्रकाशयोजनेवर यंदाच्या उत्सवात लाखो रुपयांचा खर्च होणार आहे.

दहीहंडीचा उत्सव शहरात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येत आहे. काही वर्षांपूर्वी शहरातील मध्यभागातील मंडळांकडून उत्सव साजरा करण्यात येत होता. मात्र, गेल्या पाच ते सात वर्षांत धनकवडी, वारजे, कोथरुड, सिंहगड रस्ता, विमाननगर, वडगाव शेरी, कात्रज भागातील मंडळांकडून दहीहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येत आहे. उच्च क्षमतेची ध्वनिवर्धक यंत्रणा, प्रकाश योजनेंवर लाखो रुपये खर्च करण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांपासून दहीहंडी उत्सवाला काही मंडळांकडून विधायक उपक्रमांची जोड देण्यात येत आहे. दहीहंडी उत्सवावर होणारा खर्च टाळून समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहे.

रात्री अकरापर्यंत ध्वनिवर्धकांना परवानगीची मागणी
गणेशोत्सवात पाच दिवस रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिवर्धकांना परवानगी देण्यात आली आहे. त्याप्रमाणे सार्वजनिक स्वरूपात दहीहंडी साजरी करणाऱ्या मंडळांना रात्री अकरा वाजेपर्यंत ध्वनिवर्धक वापरण्यास परवानगी देण्याची मागणी पुणे शहर दहीहंडी समन्वय समितीचे ॲड. राहुल म्हस्के, अमित जाधव, नियंत लोहोकरे, राम थरकुडे, अनिकेत शेलार, कौस्तुभ देशमुख यांनी केली आहे. दहीहंडी उत्सव नियमांचे पालन करून साजरा करण्यात येणार आहे, असे त्यांनी नमूद केले.

दहीहंडीचा उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. दहीहंडीच्या उत्सवासाठी मध्यभागात मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. पोलिसांकडून मध्यभागातील मंडई परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. ध्वनिवर्धकाबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या नियमांचे पालन मंडळांनी करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. दहीहंडी उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांची बैठक आयोजित करण्यात आली असून पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. – प्रियंका नारनवरे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ एक



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply