पुणे : मावळ लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादीकडे जाईल म्हणून शिंदे गटात गेलो – खासदार श्रीरंग बारणे

पुणे : भविष्यात महाविकास आघाडी राहिल्यास मावळ मतदार संघ राष्ट्रवादीकडे जाऊ शकतो, पुन्हा पार्थ पवार निवडणूक लढवू शकतात, म्हणूनच भविष्याचा विचार करून आपण शिंदे गटात सहभागी झाल्याचं शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी स्पष्ट केलं आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमुळे शिवसेना पक्षाच मोठं नुकसान झालं आहे, भविष्यात भाजप सोबत जाणं गरजेचं असल्याने आपण शिंदे गटात सहभागी झाल्याचं त्यांनी नमूद केलं.

“राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पार्थ पवार यांच्यासाठी मावळ लोकसभा जागेची मागणी केली. त्यावेळी शिवसेना पक्षातून एकाही नेत्याने त्याला विरोध केला नाही. पारंपरिक मावळ मतदार संघ शिवसेनेचा आहे, भविष्यातही राहील, शिवसेनेचा विरोध राहील असं वक्तव्य कोणीही केलं नाही. २०१४ आणि २०१९ ला भारतीय जनता पक्षाने शिवसेना पक्षासाठी काम केलं. भविष्याचा विचार करून उद्या जर महाविकास आघाडी राहिली तर शिवसेनेच्या उमेदवाराला कठीण जाण्यासारखं होतं. ही बाब नेहमी पक्ष प्रमुखांच्या कानावर घातली. शेवटी निर्णय घेणं भाग पडलं” असं बारणे म्हणाले.

“शिवसेना पक्ष एकसंघ व्हावा असा प्रयत्न केला. पण त्याच्यातून काही साध्य झालं नाही. शिवसेना टिकवण्यासाठी बाळासाहेबांचे हिंदुत्व, त्यांचे विचार टिकवण्यासाठी भाजपा-सेना युती गरजेची होती. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि काँग्रेसमुळे शिवसेना पक्षाचं अतोनात नुकसान झालं. शिवसेना अभियानांतर्गत राज्यभर आम्हाला दौरे करायला लावले. तेव्हा पदाधिकारी,कार्यकर्त्यांचा रोष राष्ट्रवादीवर असल्याचं समजलं. तसा अहवाल पक्ष प्रमुखांना सादर केला. भविष्याचा विचार करून भाजपा सोबत राहणं योग्य वाटलं म्हणून शिंदे गटात सहभागी झालो” अशी भुमिका बारणे यांनी मांडली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply