पुणे : ‘मागणी करूनही गृहमंत्रीपद मिळाले नाही’; राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीत अजित पवारांची खंत

पुणे : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर गृहमंत्री करावे, अशी मागणी केली. मला उपमुख्यंमत्री करण्यात आल्यानंतरही मी वरिष्ठांकडे गृहमंत्रीपदाची मागणी केली होती. मात्र, अनिल देशमुखांकडे गृहमंत्रीपद देण्यात आले. देशमुख यांच्यानंतर दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे ही जबाबदारी वरिष्ठांनी सोपविली, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीर मेळाव्यात व्यक्त केली. गृहमंत्री झालो तर मी कोणाचे ऐकणार नाही, अशी भीती कदाचित वरिष्ठांना वाटत असेल. त्यामुळे मला गृहखाते दिले नसावे, असेही अजित पवार यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसची शहर कार्यकारिणीची बैठक शुक्रवारी पुण्यात आली. या बैठकीवेळी शहरातील आठही विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. खासदार  अ‍ॅड. वंदना चव्हाण, आमदार सुनील टिंगरे, आमदार चेतन तुपे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. या बैठकीवेळी एका कार्यकारिणी पदाधिकाऱ्याने राज्यात पुन्हा सत्ता आल्यानंतर अजित पवार यांनी गृहमंत्रीपद घ्यावे, असे सांगितले. त्यावर बोलताना मागणी करूनही गृहमंत्री पद मिळाले नाही, अशी खंत अजित पवार यांनी व्यक्त केली.

राज्यात सत्ता आल्यानंतर गृहमंत्रीपदाची मागणी केली, मात्र अनिल देशमुख यांना गृहमंत्री करण्यात आले. अनिल देशमुखानंतर मी पुन्हा गृहमंत्रीपदाची मागणी वरिष्ठांकडे केली. मात्र तेव्हाही दिलीप वळसे पाटील यांच्याकडे ती जबाबदारी सोपविण्यात आली. मी ऐकणार नाही, या भीतीपोटीच माझ्याकडे वरिष्ठांनी ही जबाबदारी दिली नसावी, असे अजित पवार यांनी सांगताच सभागृहात हशा पिकला.

पवार म्हणाले,की मला जे योग्य वाटते तेच मी नेहमी करतो. पक्षाचा कार्यकर्ता चुकीचा वागला, तर त्याला माफ केले जाणार नाही. सर्वासाठी सारखाच नियम आहे. कार्यकर्त्यांवर अन्याय होत असेल तर मी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन. मात्र, चुकीचे काम केले तर त्याला पाठीशी घातले जाणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शहरातील हडपसर, वडगावशेरी, पर्वती आणि पुणे कँटोन्मेंट या चार विधानसभा मतदारसंघाचा आढावा अजित पवार यांनी या वेळी घेतला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply