पुणे : महिला सुरक्षेसाठीचे बडीकॉप पुन्हा कार्यान्वित

पुणे : सरकारी व खासगी कार्यालयात काम करणाऱ्या नोकरदार महिलांच्या सुरक्षेसाठी पुणे पोलिसांनी सुरू केलेली बडीकॉप सुविधा पुन्हा कार्यान्वित करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रसार झाल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे हा उपक्रम गेले दोन वर्ष बंद होता. मात्र आता संसर्ग कमी झाल्यानंतर पुन्हा बडीकॉप कार्यान्वित करण्यात आले आहे. गृहिणी तसेच नोकरदार महिलांच्या सुरक्षेसाठी तसेच त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी पुणे पोलिसांनी बडीकॉप योजना सुरू केली होती. मात्र कोरोनामुळे ही योजना बंद पडली. मात्र आता महिलांच्या तक्रारींची निराकरण करण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना समाजमाध्यमावर बडीकॉप नावाने ग्रुप सुरू करावा.

या ग्रुपमध्ये नोकरदार महिलांचा समावेश असावा. महिलांसाठी एखाद्या महिलेने मदत मागितल्यास तिला त्वरित साहाय्य करण्याच्या सूचना पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिल्या आहेत. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त गजानन टोम्पे, नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष बाल सुरक्षा पथकातील पोलिस निरीक्षक राजेंद्र कदम, सहाय्यक निरीक्षक अर्चना कटके या योजनेचे काम पाहणार आहेत.

शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेचे कामकाज सुरू राहणार आहे. शासकीय कार्यालये, माहिती-तंत्रज्ञान कंपन्या तसेच खासगी कंपन्यातील महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी या परिसरात नियमित गस्त घालण्यात येणार आहे. महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्याच्या पातळीवर समाजमाध्यमावर एक ग्रुप तयार करण्यात येणार आहे. त्यात पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शासकीय, खासगी कंपनीतील कर्मचारी महिलांचा समावेश करण्यात येणार आहे.

शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पोलिस काका, पोलिस दीदी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. करोना संसर्गामुळे तसेच शाळा, महाविद्यालये बंद असल्याने या योजनेच्या कामकाजावर परिणाम झाला होता. विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी पोलिस काका, पोलिस दीदी योजनेतील कर्मचाऱ्यांनी शहरातील शाळा, महाविद्यालयातील मुख्याध्यापक तसेच प्राचार्यांच्या संपर्कात राहावे. विद्यार्थी विशेषतः विद्यार्थिनींच्या तक्रारी सोडविण्यात याव्यात. शाळा- महाविद्यालयांना सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply