पुणे महापालिकेला न्यायालयाचा दणका, खड्ड्यामुळे अपघाती मृत्यूप्रकरणी कुटुंबाला १६ लाखांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश

पुणे : खड्ड्यामुळे दुचाकी घसरून अपघाती मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयांना १६ लाख रुपये १६ टक्के व्याजासह नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयातील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश एस. एस. शिंदे यांनी पुणे महानगरपालिकेला दिले आहे.

यश दिनेश सोनी (वय २०) याचा खड्ड्यातून दुचाकी घसरून झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता. याबाबत त्याचे वडील दिनेश फुलचंद सोनी (वय ५२, रा.औरंगाबाद) यांनी पुणे महानगरपालिकेच्या विरोधात दिवाणी दावा दाखल केला होता. या दाव्यात त्यांनी एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी महापालिकेकडे केली होती. दुचाकीस्वार यश २६ जून २०१६ रोजी संचेती रुग्णालय चौकातून शिवाजीनगर न्यायालयाकडे निघाला होता. शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरात मोठा खड्डा पडला होता. या खड्ड्यातून दुचाकीस्वार यश घसरला. त्यानंतर दुभाजकावर लावलेला लोखंडी गज यशच्या छातीत शिरला. अपघातात यशचा जागीच मृत्यू झाला.

सार्वजनिक रस्त्यांची योग्य देखभाल करून रस्ते सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. महापालिका आपली जबाबदारी पार पाडण्यास अपयशी ठरल्याने अर्धवट कापलेल्या गजामुळे यशचा मृत्यू झाला. दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी महापालिकेने एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सोनी यांनी दाखल केलेल्या दाव्यात केली होती.

यश भरधाव वेगाने दुचाकी चालवित होता. दुचाकीस्वार यशचे नियंत्रण सुटून तो दुभाजकावर आदळला, असा दावा महापालिकेच्या वतीने करण्यात आला. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून महापालिकेने यश सोनी याच्या कुटुंबीयांना १६ लाख २० हजार रुपये नुकसान भरपाई, तसेच अंत्यविधीचा खर्च १५ हजार रुपये १६ टक्के व्याजासह दावा दाखल केल्याच्या दिनांकापासून द्यावा, असे आदेश न्यायालयाने दिले.

लोखंडी दुभाजक योग्य स्थितीत ठेवला नाही. त्याची देखभाल करणे महापालिकेची जबाबदारी आहे. महापालिकेने योग्य जबाबदारी पार पाडली नाही. महापालिकेच्या चुकीमुळे अपघात झाल्याचे ताशेरे न्यायालयाने महापालिकेवर ओढले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply