पुणे महापालिकेतील पदांच्या परीक्षेला कागदपत्रांअभावी उमेदवार मुकले

पुणे : महापालिकेतील सहा विविध पदांसाठीची ऑनलाइन परीक्षा गुरुवारी राज्यातील पंधरा शहरांत घेण्यात आली. परीक्षेसाठी नोंदणीकृत ८६ हजार ९९४ उमेदवारांपैकी ६७ हजार २५४ उमेदवारांनी परीक्षा दिली. अनेक ठिकाणी मूळ कागदपत्रांसह छायांकित प्रत नसल्याने अनेक उमेदवारांना परीक्षेला मुकावे लागल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

गेल्या वर्षी राज्य शासनाने महापालिकेला पदभरती करण्यास मान्यता दिली होती. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) १३५, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) ५, कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) ४, सहायक अतिक्रमण निरिक्षक १००, लिपिक २०० लिपिक आणि सहायक विधी अधिकारी ४ असे एकूण ४४८ पदांची भरती सरळसेवा पद्धतीने घेण्याचे नियोजन महापालिकेकडून करण्यात आले होते. त्याबाबतची प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली आणि ऑनलाइन परीक्षा जाहीर करण्यात आली.

राज्यातील सुमारे १५ शहरांत परीक्षा घेण्यात आल्या.बोगस उमेदवारांना आळा घालण्यासाठी मूळ ओळखपत्रासह छायांकित प्रत उमेदवारांना बंधकारक करण्यात आली होती. विवाहित महिलांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक करण्यात आले होते. मात्र अनेक उमेदवारांकडे आवश्यक कागदपत्रे नव्हती. त्यामुळे अनेकांना परीक्षा देता आली नाही. सरासरी ७७.३० टक्के उमेदवारांनी परीक्षा दिली. दरम्यान, काॅपी केल्याप्रकरणी एका उमेदवाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सेवक वर्ग विभागाकडून देण्यात आली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply