पुणे : महात्मा फुले मंडई परिसराचा कायापालट; महामेट्रो, महापालिकेकडून आराखडा तयार

पुणे: ऐतिहासिक महात्मा फुले मंडई परिसराचा येत्या काही दिवसांत कायापालट होणार असून महामेट्रो आणि महापालिकेकडून मंडई परिसराचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सुरळीत वाहतूक व्यवस्था, पादचाऱ्यांसााठी विना अडथळा मार्गक्रमण, खुल्या रंगमंचाच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रम, मंडई परिसरातील ऐतिहासिक वास्तूंसाठी हेरिटेज वाॅक, जुन्या मंडईच्या वास्तूच्या बाजूला नवीन भवन, मेट्रो कामांमुळे विस्थापित झालेल्या दुकानांचे पुनर्वसन अशा विविध बाबींचा या आराखड्यात समावेश आहे. त्यासाठी ११ कोटी ६८ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

महात्मा फुले मंडई परिसरात भूमिगत मेट्रो मार्गिकेचे काम सध्या वेगाने सुरू आहे. मंडईची ऐतिहासिक वास्तू आणि त्या परिसरात असणारे विविध वस्तूंचे मार्केट, दुकाने यामुळे हा परिसर अतिशय गजबजलेला असतो. लाल महाल, शनिवार वाडा, नाना वाडा, विश्रामबाग वाडा, कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, त्रिशुंड गणपती, तुळशीबाग अशी ठिकाणे अनुक्रमेे कसबा पेठ, शुक्रवार पेठ, सोमवार पेठ, बुधवार पेठ परिसरात आहेत. या सर्व ठिकाणांना जोडण्यासाठी आणि त्यांचा ऐतिहासिक वारसा सांगण्यासाठी हेरिटेज वाॅक ही संकल्पनाही या आराखड्यात समाविष्ट करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार आणि महामेट्रोचे प्रकल्प संचालक अतुल गाडगीळ यांनी या आराखड्यावर स्वाक्षरी केली असून आराखड्याचा खर्च या दोन्ही यंत्रणा मिळून करणार आहेत.

मंडई मेट्रो स्थानक आणि बुधवार पेठ मेट्रो स्थानक यामुळे परिसरातील बसथांबे, ई-रिक्षा, सायकल, दुचाकी, तीनचाकी, चारचाकी गाड्यांच्या पार्किंगाचा विचार आराखड्यात करण्यात आला आहे. पादचाऱ्यांसाठी पादचारी मार्ग आणि भूमिगत मार्गांचे नियोजनही करण्यात आले असून तांबट आळी, बुरुड गल्ली, धार्मिक स्थळे, महात्मा फुले मंडई आणि तुळशी बाग या ठिकाणी सेल्फ गाइडेड ऑडिओ टूर सुरू करण्याचे नियोजित आहे. मेट्रोच्या कामांमुळे विस्थापित झालेल्या दुकानांचे मंडईच्या बाजूला नवीन भवन बांधून पुनर्वसन केले जाणार आहे. जुन्या मंडईच्या भवनाला अनुरूप त्याची रचना असेल. नवीन भवनाचे बाह्यरूप मंडईच्या हेरिटेज वास्तूला साम्य असणारे तयार करण्यात येणार आहे.

मंडई परिसरात खुला रंगमंच उभारण्यात येणार असून वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आवश्यक पायाभूत सुविधांचे विकसन येथे केले जाणार आहे. मंडईच्या मुख्य वास्तूच्या बाजूला पादचाऱ्यांसाठी विनाअडथळा मार्गक्रमण करण्यासाठी स्वतंत्र मार्ग करण्यात येणार असून दुचाकी, तीनचाकी, चारचाकींना त्यामध्ये मज्जाव करण्यात येणार आहे. या प्रस्तावित आराखड्यामुळे मंडई परिसराचे रूप पालटणार असून मंडई परिसर पादचारी स्नेही करण्यात येणार आहे, असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डाॅ. ब्रिजेश दीक्षित यांनी दिली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply