पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात येणार; औरंगाबादमध्ये सभा

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची १ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. या सभेला अखेर गुरुवारी पोलिसांनी परवानगी दिली. मात्र, काही अटी व शर्तीही लादल्या आहेत. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर रविवारी (ता. १) होणाऱ्या सभेसाठी शुक्रवारी (ता. २९) सायंकाळी चार वाजता राज ठाकरे पुण्यात येणार आहे. 

पुण्यात राज ठाकरे यांनी सभा घेत राज्य सरकारला ३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवण्यास सांगितले होते. तसेच १ मे रोजी औरंगाबादमध्ये मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा घेणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, त्यांच्या सभेला परवानगी मिळाली नव्हती. दोन दिवसांत सभेबाबत निर्णय घेऊ असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जाहीर केले होते. त्यानुसार त्यांच्या सभेला गुरुवारी परवानगी देण्यात आली.

सभेला जाण्यापूर्वी राज ठाकरे उद्या सायंकाळी चार वाजता पुण्यात येणार आहे. यानंतर ३० एप्रिलला सकाळी राज ठाकरे औरंगाबादकडे रवाना होतील. यावेळी राज ठाकरे यांच्या ताफ्यात शंभराहून अधिक चारचाकी गाड्या असतील. राज ठाकरे यांच्या सभेआधी मनसेचे कार्यकर्ते मोठे शक्तिप्रदर्शन करणार आहेत. पुण्यातून हजारो कार्यकर्ते राज ठाकरेंसोबत औरंगाबादला जाणार आहेत.

मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या सभेसाठी तयारी पूर्ण केली आहे. खास प्रचारगीतही लॉंच केले आहे. औरंगाबादमध्ये होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेसाठी १५ विविध प्रकारच्या अटी पोलिसांनी घातल्या आहेत. या अटी-शर्तीचे पालन केले जाईल अशी ग्वाही मनसेकडून देण्यात आली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply