पुणे : मनसेची भिस्त ‘राज’दूतांवर ! ; हजार मतदारांमागे मनसेचा एक राजदूत, निवडणुकीसाठी मनसेची नवी रणनीती

पुणे : आगामी महापालिका निवडणुका कधी होणार, याबाबत अनिश्चितता असली तरी निवडणूक तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनही निवडणुकीसाठी खास रणनीती निश्चित करण्यात आली असून मनसेची धुरा राजदूतांवर असणार आहे. येत्या काही दिवसांत मनसे साडेतीन हजार राजदूतांची नियुक्ती करणार आहे.आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढविण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने संघटनात्मक बांधणीवर मनसेने भर दिला असून मतदारांपर्यत पोहोचण्यासाठी मनसेने राजदूत ही नवी संकल्पना राबविण्याचे निश्चित केले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच मुंबईत पदाधिकारी आणि पक्षाच्या सचिवांची बैठक घेतली. त्यानुसार पुण्यात मनसेची ३ हजार ५०० राजदूतांची फौज नियुक्त केली जाणार आहे. या नव्या संकल्पनेच्या माध्यमातून मनसे पुण्याच्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. मनसेच्या संघटनात्मक पातळीवरच्या विभागनिहाय नेमणुका याअंतर्गत करण्यात येणार आहेत. दरहजारी मतदारांच्या मागे एक राजदूत नेमण्यासाठी आवश्यक तयारी मनेसेकडून सुरू झाली आहे. संबंधित भागात पक्षाची ध्येय धोरणे यांचा प्रचार आणि प्रसार करण्याची जबाबदारी राजदूतांकडे सोपविण्यात आली आहे. तसेच ज्या प्रभागात पक्षाचा नगरसेवक आहे. त्या नगरसेवकाने केलेले काम ही मतदारापर्यंत पोहचविण्याचे आदेश राजदूतांना देण्यात येणार आहेत.

राजदूतांची नेमणूक करण्यात आल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पुण्यात मेळावा होईल. या मेळाव्यानंतर लगेच आगामी पुण्याच्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची सभाही घेण्याचे नियोजन पक्षपातळीवर सुरू झाले आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी मनसेची ही नवी संकल्पना किती उपयुक्त ठरेल, असा दावा करण्यात आला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply