पुणे : पोखरी घाटातील दरड दूर करण्यात प्रशासनाला यश; – वाहतूक सुरळीत

पुणे : जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर सध्या कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे श्री क्षेत्र भीमाशंकर कडे जाताना पोखरी घाटामध्ये दरड पडली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने ही दरड बाजूला करून रस्ते वाहतूक पूर्ववत केल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रविवारी (१० जुलै) सायंकाळी घाटात एका ठिकाणी दरड कोसळली होती. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोखरी घाटामध्ये भीमाशंकरकडे जाताना डाव्या बाजूला असलेल्या डोंगराची दरड कोसळली असल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले. या ठिकाणी प्रांत अधिकारी सारंग कोडोलकर, तहसीलदार रमा जोशी, सार्वजनिक बाधकाम विभागाचे सुरेश पठाडे यांना आंबेगाव आपत्ती व्यवस्थापन कक्षाला कळवले. या वेळी एका बाजूने वाहतूक चालू होती. सार्वजनिक बाधकाम विभागाने रस्त्यावरील दरड काढण्याचे काम जेसीपी आणि ट्रकद्वारे सुरू केले. सोमवारी दुपारी दरड आणि गाळ पूर्णपणे बाजूला काढून येणारी आणि जाणारी वाहनाची वाहतूक पुर्ववत करण्यात यश आले, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

श्री क्षेत्र भीमाशंकर अभयारण्यात दाट झाडी व धुके तसेच मुसळधार पडणारा पाऊस यामुळे गिर्यारोहण करताना रस्ता भरकटलेल्या सहा तरुणांची सुटका घोडेगाव पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांनी सोमवारी पहाटे केली. पुणे जिल्ह्याच्या बाहेरून सहा तरूण बैलघाट मार्गे भिमाशंकर येथे गिर्यारोहणासाठी आले होते. भीमाशंकर येथे मुसळधार पाऊस व धुके पडल्यामुळे रविवार सायंकाळी पाच वाजता अंधार पडला होता. त्यामुळे हे तरूण रस्ता भरकटले. मोबाइलला रेंज आल्यानंतर त्यांनी घोडेगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी भीमाशंकर येथील स्थानिक नागरिकांच्या मदतीने तरुणांना बाहेर काढले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply