पुणे : पूर्व हवेलीत तापमानाचा पारा ४१ अंशावर

लोणी काळभोर - गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे उन्हाची तीव्रता कमी झाली होती. अशात गुरुवारी (ता. २८) पुन्हा एकदा उन्हाचा चटका पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, उरुळी कांचनसह परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. दिवसभर तीव्र सूर्य किरणांपासून बचाव करताना पूर्व हवेलीतील नागरिकांची दमछाक झाली आहे. रस्ते प्रचंड उन्हाने तापत असल्याने रस्त्यावरुन प्रवास करताना उन्हाच्या झळा लोकांना भाजून काढत आहेत. सकाळी नऊ वाजल्यापासूनच उन्हाचा तडाखा बसत असून संध्याकाळी साडेसहा पर्यंत गरम झळा लोकांना त्रासदायक ठरत आहेत. उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तविलेली असताना आगामी काही दिवस अशाच स्वरूपात उन्हाचा तडाखा कायम राहाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या लोणी काळभोर व उरुळी कांचनचे सरासरी किमान तापमान २० अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअसपर्यंत पोचले आहे. एप्रिल महिना संपत असताना आत्तापासून उन्हाची तीव्रता जाणवते आहे. गुरुवारी कडक ऊन पडल्याने दिवसाच्या वेळी जनजीवन प्रभावित झाले होते. दुपारी बाजारपेठेत फारसे ग्राहकच नसल्याने अनेक दुकानदार दुपारी काही वेळासाठी घरी जात आहेत. संध्याकाळी ऊन उतरल्यानंतरच ग्राहक खऱेदीसाठी बाहेर पडत आहेत.

शहरातील प्रमुख बाजारपेठा व रस्त्यावर वर्दळ घटली आहे. कामानिमित्त बाहेर असलेल्या नागरिकांकडून उपरणे, टोपी, रुमाल आदीच्या माध्यमातून सूर्य किरणांपासून बचाव करीत असल्याचे दिसून येत होते. उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसांत पाऱ्यात आणखी वाढ होऊन उन्हाळ्याची तीव्रता वाढण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. उन्हाची तीव्रता वाढत असताना आरोग्य सांभाळणे आवश्यक झाले आहे. उन्हाच्या तीव्रतेने दुपारी रस्ते ओस पडू लागले असून बाजारपेठेवरही उन्हाचा परिणाम जाणवू लागला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. त्यानंतर तुरळक प्रमाणात पावसाने हजेरीही लावली. आता पुन्हा तापमानात वाढ झाली असून नागरिकांना उन्हाच्या झळा बसताना दिसत आहे. त्यामुळे शरिरात उष्णतेचे प्रमाण वाढल्यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळत आहे. वाढत्या उन्हामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे आरोग्याची खबरदारी घेण्याचे गरजेचे असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply