पुणे :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामुळे शहरासह जिल्ह्यात ड्रोन, पॅराग्लायडींग, बलून सफारींना मनाई ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (१४ जून) देहू येथे येणार आहेत. त्यामुळे कायदा व सुरक्षितता राखण्याच्या दृष्टीने पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि उर्वरित ग्रामीण भागात ड्रोन, पॅराग्लायडींग, हॉट बलून सफारी, मायक्रोलाईट एअरोप्लेन अशा प्रकारची अवकाश उड्डाणे करण्यास मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सोमवारी काढले.

फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ प्रमाणे हे आदेश काढण्यात आले आहेत. हे आदेश मंगळवारी (१४ जून) सायंकाळी सहा वाजेपर्यंत लागू राहतील. आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम १८८ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असेही आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराज मूर्ती, शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा मंगळवारी होणार असून मुख्य मंदिराचा कार्यक्रम झाल्यानंतर सभामंडपात वारकरी, उपस्थित भाविकांशी ते संवाद साधणार आहेत. मंगळवारी दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी पंतप्रधान मोदी यांचे लोहगाव विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर विमानतळावरून देहूकडे हेलिकॉप्टरने पंतप्रधान मोदी प्रयाण करतील. एक वाजून ४५ मिनिटांनी मंदिर समिती जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज मंदिर संस्थान परिसरात दाखल होतील.

या ठिकाणी मोदी यांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराज मूर्ती, शिळा मंदिराचा २० मिनिटांचा लोकार्पण सोहळा होणार आहे. त्यानंतर तेथून दोन वाजून दहा मिनिटांनी सभेच्या ठिकाणी मोदी दाखल होतील. या ठिकाणी ५० मिनिटांची सभा होणार असून सभामंडपात वारकरी, उपस्थित भाविकांशी ते संवाद साधणार आहेत. त्यानंतर तीन वाजून सात मिनिटांनी तेथून पंतप्रधान मोदी पुण्यातून दिल्लीकडे प्रयाण करणार आहेत, असे जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या दौऱ्यात स्पष्ट करण्यात आले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply