पुणे : द्रुतगती मार्गावरील अपघात रोखण्यासाठी २४ तास वाहन तपासणी; परिवहन आयुक्तांचे आदेश

पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अपघात रोखण्यासाठी २४ तास वाहन तपासणी करण्याचे आदेश परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी सोमवारी दिले. परिवहन आयुक्त भिमनवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व प्रादेशिक, उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची बैठक सोमवारी आयेजित करण्यात आली. या बैठकीत रस्ते सुरक्षा आणि राज्यातील विविध महामार्गांवर झालेल्या अपघातांच्या घटनांचा आढावा घेण्यात आला. त्या वेळी द्रुतगती मार्गावरील अपघात रोखणे तसेच सुरक्षाविषयक उपाययोजना याबाबत सेव्ह लाइफ फाउंडेशन आणि ब्लूमबर्ग संस्थेकडून काम करण्यात येेत आहे. या संस्थांच्या प्रतिनिधींकडून बैठकीत रस्ते सुरक्षा तसेच उपाययोजनांबाबत सादरीकरण करण्यात आले. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग तसेच जुना मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या अपघातांबाबत या संस्थेच्या प्रतिनिधींकडून सादरीकरण करण्यात आले. द्रुतगती मार्गावर पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांच्या अपघातांचे प्रमाण जास्त असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.

डिसेंबर महिन्यात मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि मुंबई-पुणे महामार्गावर पुणे आणि पनवेल विभागाकडून विशेष मोहीम राबविण्यात यावी. या मोहिमेत पोलीस, परिवहन विभाग तसेच आयआरबीचे पथक २४ तास गस्त घालणार आहेत. या मोहिमेत सहभागी होणाऱ्या पथकांची संख्या तसेच अन्य उपाययोजनांबाबत आराखडा करण्यात येणार आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर २४ तास वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे, असे आदेश भिमनवार यांनी बैठकीत दिले.

द्रुतगती मार्गावर अपघातामागची कारणे
द्रुतगती मार्गावर घाट उतरताना वाहनांचे ब्रेक निकामी होऊन अपघात होतात. मार्गिका सोडून वाहने पुढे जातात. द्रुतगती मार्गावर वाहने बंद पडतात. अशा वेळी पाठीमागून वेगाने येणारे वाहन थांबलेल्या वाहनांवर आदळते. बहुतांश अपघात वेगामुळे होत असून अपघात रोखण्यासाठी वाहनांची तपासणी करण्याचे आदेश परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी दिले. अपघात रोखण्यासाठी वाहनाचालकांनी स्वयंशिस्त पाळायला हवी. वाहतूक नियमांचे पालन करायला हवे, असे आवाहन भिमनवार यांनी केले आहे.

परिवहन विभागाच्या ८२ सेवा ऑनलाइन
नागरिकांच्या सोयीसाठी परिवहन विभागाकडून देण्यात येणाऱ्या ११६ सेवांपैकी ८२ सेवा ऑनलाइन पद्धतीने देण्यात येत आहेत. ऑनलाइन सेवेमुळे नागरिकांना प्रत्यक्ष परिवहन कार्यालयात येण्याची आवश्यकता नसल्याची माहिती भिमनवार यांनी दिली.

पुण्यात ५२ हजार इलेक्ट्रिक वाहनांची नोंद
इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरास शासनाकडून प्रोत्साहन देण्यात येत आहे. प्रादेशिक परिवहन विभागाच्या पुणे विभागात आतापर्यंत ५२ हजार ५२० इलेक्ट्रिक वाहनांची नोंद करण्यात आली आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या करात शासनाने सवलत दिली असून महसुलापेक्षा पर्यावरण संवर्धनास महत्त्व देण्यात आले असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी डाॅ. अजित शिंदे यांनी सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply