पुणे : ‘देशात येत्या २ वर्षात वीजेवर चालणाऱ्या वाहनांची संख्या ३ कोटींपर्यंत जाईल’- नितीन गडकरी

पुणे : गेल्या काही दिवसांत विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या खपात तब्बल १३०० टक्क्यांची वाढ झाली आहे. देशात सध्या १२ लाख विजेवर चालणारी वाहनं आहेत. डिसेंबरपर्यंत हा आकडा ४० लाखांपर्यंत जाईल. तर येत्या दोन वर्षात ही संख्या तीन कोटींपर्यंत जाईल. त्यामुळे वाहन उद्योग क्षेत्रात खूप वाव असून या क्षेत्रात खूप मोठ्या संधी उपलब्ध आहेत, असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात व्यक्त केलं आहे. सायन्स टेक्नॉलॉजी पार्कचे पाठबळ असलेल्या पाच नवउद्यमींच्या (स्टार्टअप) अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की, ‘विजेवर चालणाऱ्या वाहनांत लागणारी लिथियम आयर्न बॅटरी ऑस्ट्रेलिया, चीन किंवा अर्जेंटिना या देशांतून आयात करावी लागते. मात्र फरिदाबाद येथील इंडियन ऑइलच्या प्रयोगशाळेनं पर्यायी ॲल्युमिनियम एअर टेक्नॉलॉजी शोधली आहे. याशिवाय देशात लिथियम आयर्न बॅटरीसोबत झिंक आयर्न, ॲल्युमिनियम आयर्न, सोडियम आयर्न यावरही काम झालं आहे. परिणामी आगामी काळात विजेवर चालणाऱ्या वाहनांना खूप वाव असणार आहे.’

सध्या देशात अर्धवाहकाचा (सेमीकंडक्टर) तुटवडा आहे. हे सेमिकंडक्टर धुण्याच्या यंत्रापासून चारचाकीपर्यंत सर्वत्र वापरले जाते. त्यामुळे आपल्या ऑटोमोबाइल निर्यातीला फटका बसला आहे. देशात होणारे संशोधन प्रत्येक जिल्हा, प्रदेशाच्या गरजेनुसार झालं पाहिजे. तसेच देशाची भविष्यातील गरज काय, आपण आयात काय करतो आणि काय निर्यात करू शकतो, याबाबत जागरूकता निर्माण झाली पाहिजे. त्यादृष्टीने संशोधन झाल्यास आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होईल, असंही गडकरी यावेळी म्हणाले.

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या सल्लागार डॉ. अनिता गुप्ता, पार्कचे उपाध्यक्ष प्रतापराव पवार, महासंचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगदाळे, अध्यक्ष दिलीप बंड आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी आपल्या फसलेल्या प्रयोगाची देखील माहिती दिली.

ते म्हणाले की, “माझ्याकडे एक ट्रॅक्टर होता. मात्र, डिझेलला खूपच पैसे खर्च होत असल्याने मी हा ट्रॅक्टर सीएनजीचा करून घेतला. पण माझ्या गावात सीएनजीचा पंपच नाही. त्यामुळे हा ट्रॅक्टर नागपूर शहरात झाडांना पाणी देण्यासाठी महापालिकेला विनामूल्य देऊन टाकला. त्यानंतर मला पुन्हा नवीन ट्रॅक्टर विकत घ्यावा लागला. या प्रयोगाचा मला आर्थिक फटका बसला, असं गडकरी यांनी सांगताच सभागृहात एकच हशा पिकला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply