पुणे : दुय्यम निबंधक कार्यालयातील निलंबित आणि बदली यांचा दस्त नोंदणीच्या कामावर विपरीत परिणाम

पुणे : दुय्यम निबंधक कार्यालयातील निलंबित आणि बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या जागेवर कनिष्ठ लिपिकांना बसवून कामकाज करण्यात येत आहे. यातील नवख्या लिपिकांना कामकाजाची माहिती नसल्यामुळे ऑनलाइन भाडेकरारासह इतर दस्त नोंदणीच्या कामावर विपरीत परिणाम झाला आहे. वेळेत दस्त नोंदणी व्हावी, यासाठी तातडीने उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी असोसिएशन ऑफ रिअल इस्टेट एजंट संघटनेने केली आहे.

शहरातील नोंदणी विभागातील दुय्यम निबंधक आणि प्रभारी वरिष्ठ लिपिकांनी रेरा कायद्याचे उल्लंघन करून दस्त नोंदणी केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. याप्रकरणी नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाकडून ४४ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यापैकी काही अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. काहींची बदली केली, काहींची विभागीय चौकशी सुरु आहे, तर काहींना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. अधिकाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई झाल्यामुळे कनिष्ठ लिपिकांकडून ती कामे करून घेण्यात येत आहेत.

परंतु त्यांना नोंदणी विभागाचे दुय्यम निबंधक पातळीवरील कामकाजाची फारशी माहिती नसल्यामुळे ऑनलाइन भाडेकरार आणि दस्त नोंदणीचे काम प्रभावित झाले आहे, अशा आशयाचे निवेदन संघटनेच्या वतीने सहजिल्हा निबंधक अनिल पारखे यांना देण्यात आले. या वेळी शिष्टमंडळात अध्यक्ष सचिन शिंगवी, पदाधिकारी मगरध्वज काशीद, योगेश पंपालिया, जयदीप म्हाळगी उपस्थित होते

आरटीई प्रवेश, सरकारी कामकाज, आरटीओ कार्यालयात वाहन नोंदणी, भाडेकरूंना सोसायटीमध्ये प्रवेश, नवीन बँक खाते आयटी रिटर्न अशा विविध कामांसाठी नागरिकांना पत्त्याचा पुरावा म्हणून ऑनलाइन भाडे करार ग्राह्य धरला जातो. दुय्यम निबंधक हवेली क्रमांक ४, ७, ११, १४, १६, २१, २२ या कार्यालयांमध्ये वारंवार निवेदने देऊनही वेळेत दस्त नोंदणी होत नाही, अशी तक्रार निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply