पुणे : दस्त नोंदणीतून ३४ हजार कोटींचा महसूल

पुणे : राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गतवर्षीच्या तुलनेत मालमत्ता खरेदी-विक्रीच्या दस्त नोंदणीत घट झाली. परंतु दस्त नोंदणीतून राज्य सरकारच्या तिजोरीत तब्बल ३४ हजार कोटींचा महसूल जमा झाला आहे. यंदा दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत महसुलात सुमारे पाच हजार कोटींची वाढ झाली आहे.

राज्याला मार्च २०२२ अखेर दस्त नोंदणीतून ३२ हजार कोटींचे उद्दिष्ट्य देण्यात आले होते. परंतु कोरोनामुळे हे उद्दिष्ट २९ हजार कोटी रुपये करण्यात आले. कोरोनाची दुसरी लाट ओसरताना नागरिकांचा मालमत्ता खरेदी-विक्रीचा कलही वाढला. मार्चअखेर राज्यात २३ लाख ७० हजार ४०८ दस्त नोंदणी झाली आहे. त्यातून राज्य सरकारला ३४ हजार कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला. महसुलात वाढ झाली असली तरी दस्त नोंदणीमध्ये गतवर्षीच्या तुलनेत १५ टक्क्यांनी घट झाली आहे, अशी माहिती नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांनी दिली.

मार्चअखेरमुळे मागील आठवड्यात दस्त नोंदणीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. संगणकाच्या सर्व्हर डाउनमुळे दस्त नोंदणीमध्ये अडचणी येत होत्या. परंतु या विभागाकडून उपाययोजना करण्यात आल्या. त्यामुळे दस्त नोंदणीची प्रक्रिया पूर्ववत झाली. त्यामुळे मागील बुधवारी आणि गुरुवारी राज्यात विक्रमी दस्त नोंदणी झाली. बुधवारी एकाच दिवशी २१ हजार ५०० दस्त नोंदणी होऊन २६५ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला. तर, गुरुवारी १४ हजार ४०० दस्त नोंदणी झाली. त्यातून सुमारे २२२ कोटींचा महसूल प्राप्त झाला. मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर मोठ्या शहरांमध्ये दस्त नोंदणीसाठी नागरिकांनी अडचण येऊ नये, यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयाच्या कामकाजाची वेळ वाढवून देण्यात आली होती. तसेच, शनिवार आणि रविवारी दस्त नोंदणी सुरु होती.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply