पुणे : ‘तापाकडे दुर्लक्ष नको, डासांची उत्पत्ती रोखा’; ‘झिका’च्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथक राज्यात

पुणे : पालघरमध्ये झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय आणि खबरदारीसाठी केंद्रीय तज्ज्ञ आणि कीटक शास्त्रज्ञांचे पथक महाराष्ट्रात येऊन दाखल झाले आहे. ताप आल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांना दाखवावे आणि डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन या पथकाकडून करण्यात आले आहे.

 डासांपासून उद्भवणाऱ्या झिका या विषाणूचा यावर्षीचा पहिला रुग्ण पालघर जिल्ह्यात आढळून आला आहे. तेथील तलासरी तालुक्यातील आश्रम शाळेत एका नऊ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे.  त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून केंद्राचे एक पथक महाराष्ट्रात दाखल झाले असून या पथकामध्ये पुणे आणि दिल्ली येथील तज्ज्ञांचा समावेश आहे. राज्याचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. महेंद्र जगताप यांनी याबाबत माहिती दिली.

डॉ. महेंद्र जगताप म्हणाले, पालघर जिल्ह्यातील गावात झिकाचा रुग्ण आढळल्यानंतर तीन किलोमीटरच्या क्षेत्रातील पाच गावांमध्ये सर्वेक्षण करण्यात येत आहे. या गावांमधील आठ रुग्णांच्या रक्ताचे नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठवण्यात आले आहेत. डास अळय़ांच्या नमुन्यांचाही यामध्ये समावेश आहे.  डॉ. जगताप  म्हणाले, ताप येणे, अंगावर पुरळ येणे, डोळे येणे, अंगदुखी, थकवा, डोकेदुखी ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. लक्षणे सौम्य असतात आणि दोन ते सात दिवसांपर्यंत राहतात. लक्षणे असलेल्या रुग्णांनी पॅरासिटामॉलसारखे औषध, संपूर्ण विश्रांती आणि भरपूर पाणी पिणे आवश्यक असल्याचे डॉ. जगताप यांनी स्पष्ट केले. खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी असे रुग्ण आढळल्यास त्यांचे नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडून तपासून घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply