पुणे : तापमानात वाढ, पावसाची हजेरी; आणखी दोन दिवस राज्यात पावसाची शक्यता

पुणे : कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम म्हणून राज्याच्या बहुतांश भागात ढगाळ स्थितीमुळे रात्रीच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात तुरळक भागांत हलक्या पावसानेही हजेरी लावली. पुणे शहरातही पावसाचा शिडकावा झाला. पुढील दोन दिवस राज्याच्या विविध भागांत पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ शमल्यानंतर त्याचे कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर झाले. त्यामुळे दक्षिणेकडील तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ आदी राज्यांत पाऊस झाला. कमी दाबाच्या प्रणालीचा परिणाम महाराष्ट्रावरही सध्या सुरू झाला आहे. पुढील दोन दिवस हा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या बाष्पाचा पुरवठा होत आहे. प्रामुख्याने सध्या महाराष्ट्राच्या दक्षिण-पश्चिम भागामध्ये पावसाची शक्यता आहे. रविवारी दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यांत हलक्या पावसाने हजेरी लावली. पुढील दोन दिवसांत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर आदी जिल्ह्यांसह विदर्भात काही भागांत पावसाची शक्यता आहे.

राज्यात ढगाळ स्थिती निर्माण होताच तापमानात वाढ सुरू झाली आहे. दोन दिवस राज्याच्या विविध भागांत तापमानाचा पारा नीचांकी पातळीपर्यंत खाली आला होता. त्यामुळे गारव्यात वाढ झाली होती. प्रामुख्याने मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात काही भागांत सरासरीच्या तुलनेत तापमान घटले होते. मात्र, एकच दिवसांत वातावरणाने पुन्हा कलाटणी घेतली. कोकणातील काही भाग वगळता राज्यातील सर्वच भागांतील रात्रीचे तापमान वाढले असल्याने गारवा कमी झाला आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply