पुणे : तरुणींशी मैत्रीचे आमिष दाखवून ५३ वर्षीय व्यक्तीची फसवणूक; तरुणीसह तिघांना अटक

पुणे : तरुणींशी मैत्रीच्या आमिषाने (हनी ट्रॅप) खंडणी उकळणाऱ्या तिघांना विश्रांतवाडी पाेलिसांनी अटक केली. या प्रकरणात एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत एका ५३ वर्षीय व्यक्तीने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी धीरज वीर, जाॅय मंडल यांच्यासह एका तरुणीला अटक करण्यात आली आहे.

तक्रारदार खासगी कंपनीत विपणन प्रतिनिधी आहेत. कंपनीच्या कामानिमित्त ते बाहेरगावी जातात. धानोरी भागातील एका हाॅटेलमध्ये ते कामानिमित्त गेले होते. त्यावेळी हाॅटेलमधील कामगाराने एका तरुणीशी ओळख करुन दिली. तक्रारदाराला तरुणींशी मैत्रीचे आमिष त्या तरुणीने दाखविले. तरुणीने आरोपी धीरज याच्याशी ओळख करुन दिली. धीरजने तक्रारदारकडून पैसे घेतले. त्यानंतर धीरजने तक्रारदाराला धानोरी भागात बोलावले. तरुणींची छायाचित्रे त्यांच्या मोबाइलवर पाठविण्यात आली. तक्रारदार मोटारीतून तेथे गेले होते. आरोपी धीरजने तक्रारदाराला धमकावून अपहरण केले. तसेच कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली. समाजमाध्यमावर छायाचित्रे प्रसारित करुन बदनामीची धमकी दिली. त्यांच्याकडे एक लाख रुपयांची खंडणी मागितली. घाबरलेल्या तक्रारदाराने आरोपींना एटीएम केंद्रातून ५० हजार रुपये काढून दिले. त्यानंतर तक्रारदाराला सोडून आरोपी पसार झाले.

आरोपींनी पुन्हा तक्रारदारास धमकावले. तुझी तरुणींशी मैत्री आहे. तुझ्या पत्नीला याबाबतची माहिती देतो, असे सांगून आरोपींनी पु्न्हा खंडणी मागितली. आरोपींच्या धमक्यांमुळे तक्रारदाराने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर खंडणीची रक्कम घेण्यासाठी आरोपींना विश्रांतवाडी भागात बोलावून घेण्यात आले. पोलिसांनी सापळा लावून तरुणीसह तिघांना अटक केली.

पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय भापकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक विजकुमार शिंदे, उपनिरीक्षक लहु सातपुते, शुभांगी मगदुम, हवालदार दीपक चव्हाण, यशवंत किर्वे, संपत भोसले, संजय बादरे, शेखर खराडे, संदीप देवकाते, प्रफुल्ल मोरे आदींनी ही कारवाई केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply