पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण आता अत्याधुनिक होलोग्रामच्या रूपात

पुणे : सिम्बायोसिसच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि संग्रहालयाने अत्याधुनिक तंत्रज्ञानातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा होलोग्राम साकारण्यात आला आहे. संसदेमध्ये डॉ. आंबेडकर यांनी केलेले भाषण प्रत्यक्ष पाहत असल्याचा अनुभव या होलोग्राममुळे प्रेक्षकांना मिळणार असून, महाराष्ट्रातील संग्रहालयात पहिल्यांदाच होलोग्राम तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि संग्रहालयाचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष आहे. त्या निमित्ताने साकारण्यात आलेल्या होलोग्रामचे उद्घाटन ६ मे रोजी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री डॉ. वीरेंद्र कुमार, सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित राहणार आहेत. होलोग्राम हे डिजिटल तंत्रज्ञान आहे. या तंत्राद्वारे त्रिमितीय प्रतिमा तयार करता येते. ही प्रतिमा प्रत्यक्ष असल्यासारखाच अनुभव पाहणाऱ्याला मिळतो. त्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या होलोग्राममुळे ते प्रत्यक्ष भाषण करत असताना पाहत असल्यासारखे दिसेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि संग्रहालयाच्या मानद संचालक संजीवनी मुजुमदार यांनी होलोग्रामबाबतची माहिती दिली. स्मारक आणि संग्रहालयाद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वापरलेल्या वस्तूंचे जतन करण्यात आले आहे. त्याशिवाय त्यांच्या जीवनचरित्राची मांडणीही करण्यात आली आहे. आताचे तंत्रज्ञान सातत्याने विकसित होत असल्याने या तंत्रज्ञानाचा वापर संग्रहालयासाठी करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या आभासी संग्रहालयांमध्येही डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक संग्रहालय समाविष्ट आहे. आता त्या पुढे जाऊन होलोग्राम या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. महाराष्ट्रातील संग्रहालयात पहिल्यांदाच या तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. या होलोग्राममुळे डॉ. आंबेडकर प्रत्यक्ष भाषण करत असलेले पाहता येतील. या होलोग्रामच्या निर्मितीसाठी केंद्रीय सामाजिक न्याय विभागाकडून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply