पुणे : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास; सिनेसृष्टीवर शोककळा

पुणे :  मनोरंजन क्षेत्रातून एक दु: खद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी आज (गुरूवारी) अखेरचा श्वास घेतला. विक्रम गोखले यांच्यावर गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. गोखले यांच्या पश्चात पत्नी वृषाली गोखले आणि त्यांच्या दोन मुली असा परिवार आहे.

बुधवारी रात्री गोखले यांचं निधन झालं, अशी बातमी काही प्रसारमाध्यमांनी दिली होती. मात्र, ही बातमी चुकीची असल्याचं यापूर्वीच त्यांची पत्नी वृषाली यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं होतं. विक्रम गोखलेंच्या निधनाचं वृत्त ही अफवा असून ते सध्या व्हेंटीलेटरवर आहेत असं वृषाली यांनी सांगितलं होते. गोखले यांचे निकटवर्तीय राजेश दामले यांनी सुद्धा त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली होती.

गोखले यांची प्रकृती अद्यापही अत्यावस्थ आहे, खूप कॉम्पलिकेशन्स आहेत. त्यांच्याकडून म्हणवा तसा प्रतिसाद मिळत नाहीय. जोपर्यंत डॉक्टर काही सांगत नाहीत. तोपर्यंत पुढे काही सांगू शकत नाहीत. अफवांवर कोणी ही विश्वास ठेऊ नका, डॉक्टरांकडून प्रयत्न सुरू आहेत, असं दामले यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. मात्र, आता त्यांचं निधन झालं असल्याची माहिती आहे.

नुकताच विक्रम गोखले यांनी ३० ऑक्टोबरला त्यांचा ८२ वा वाढदिवस साजरा केला. विक्रम गोखले यांनी विविध नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. विक्रम गोखले हे अभिनेत्यांच्या कुटुंबातील होते. त्यांची आजी अभिनेत्री होती, तर वडील चंद्रकांत गोखले हे देखील कलाकार होते.

विक्रम गोखले यांनी टीव्ही सीरियल, बॉलिवूड, मराठी सिनेमात अनेका भूमिका गाजवल्या आहेत. अभिनेते म्हणून त्यांची एक वेगळी ओळख होती. सिनेमांमध्ये मिळेल त्या भूमिकेला योग्य न्याय त्यांनी आजवर दिला होता. त्यांचा मोठा चाहता वर्गही आहे. मात्र घशाच्या त्रासामुळे त्यांनी नाटकातील अभिनय-संन्यास घेतला होता.

विक्रम गोखले यांना २०१३ साली प्रदर्शित झालेल्या अनुमती या चित्रपटातील अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते. चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कारानेही त्यांचा सन्मान करण्यात आला होता. गोखले यांनी 'हम दिल दे चुके सनम', 'हे राम', 'भूल भुलैया', मिशन मंगल' इत्यादी हिंदी सिनेमा काम केलं. तसेच गोखले यांच्या अभिनयाची झलक माहेरची साडी, लपंडाव, नटसम्राट, वजीर, अनुमती इत्यादी मराठी सिनेमात पाहायला मिळाली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply