पुणे जिल्ह्यातील तेरा पंचायत समित्यांचे सभापती, उपसभापती आणि सदस्यांचा कार्यकाळ रविवारी संपुष्टात आला.

पुणे: पुणे जिल्ह्यातील तेरा पंचायत समित्यांचे सभापती, उपसभापती आणि सदस्यांचा कार्यकाळ रविवारी (ता.१३) संपुष्टात आला. त्यामुळे सोमवारी (ता.१४) सकाळीच पंचायत समित्यांच्या कारभार हा प्रशासकांच्या हाती गेला आहे. त्या त्या पंचायत समित्यांचे गट विकास अधिकारी हेच प्रशासक आहेत. या सर्व प्रशासकांनी सोमवारपासून प्रत्यक्ष कारभाराला सुरवात केली आहे. यामुळे पंचायत समितीच्या सभापतींच्या सरकारी गाड्या त्या त्या पंचायत समितीच्या मुख्यालयात जमा करून घेण्यात आल्या आहेत. सभापती व उपसभापतींची सरकारी दालने कुलूपबंद करण्यात आली आहेत आणि या दालनाच्या दारावरील पदाधिकाऱ्यांच्या नावांच्या पाट्या (नामफलक) काढून घेण्यात आले आहेत. या सर्व पंचायत समित्यांच्या प्रशासकपदी त्या त्या पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांचीच नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या विद्यमान सभागृहाच्या निवडीसाठी १५ फेब्रुवारी २०१७ ला पंचवार्षिक निवडणूक घेण्यात आली होती. या निवडीनंतर पंचायत समित्यांच्या नव्या सभागृहाची पहिली बैठक ही १४ मार्च २०१७ घेण्यात आली होती. त्यामुळे या सभागृहाला १३ मार्च रोजी पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. त्रेहत्तराव्या घटनादुरुस्तीतील तरतुदीनुसार पदाधिकारी आणि सदस्यांना मुदतवाढ देता येत नाही. त्यामुळे मुदत संपताच या पंचायत समित्यांवर प्रशासकराज आले आहे. प्रशासकराज आलेल्या जिल्ह्यातील पंचायत समित्यांमध्ये बारामती, इंदापूर, आंबेगाव, खेड, जुन्नर, शिरूर, दौंड, पुरंदर, हवेली, मावळ, मुळशी, भोर आणि वेल्हे यांचा समावेश आहे. याआधी ३० जून १९९० ते २० मार्च १९९२ या कालावधीत पंचायत समित्यांच्या कारभार प्रशासकांच्या हाती गेला होता. पंचायत समितीनिहाय प्रशासक बारामती --- अनिल बागल इंदापूर --- विजय परीट दौंड --- अजिंक्य येळे शिरूर --- विजय नलावडे पुरंदर --- अमर माने भोर --- विशाल तनपुरे मावळ --- सुधीर भागवत मुळशी --- संदीप जठार खेड --- अजय जोशी आंबेगाव --- जालिंदर पठारे जुन्नर --- शरद माळी हवेली --- प्रशांत शिर्के वेल्हे --- विशाल शिंदे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply