पुणे : चाकण औद्योगिक वसाहतीत वीजकपातीची स्थिती कायम ; चार नव्या विद्युत उपकेंद्रांसाठी कार्यवाही- उदय सामंत

पुणे : चाकण औद्योगिक वसाहतीतील बहुतांश भागात वीजपुरवठा सुरळीत झाला असला, तरी काही भागांत वीजकपातीची स्थिती बुधवारीही कायम होती. या विभागात वीजपुरवठा करणाऱ्या महापारेषण कंपनीचा अतिउच्चदाबाचा ट्रान्सफार्मर नादुरुस्त झाल्यामुळे ४६८ छोट्या-मोठ्या उद्योगांचा वीजपुरवठा मंगळवारी दुपारी खंडित झाला होता. त्यानंतर महावितरणकडून पर्यायी व्यवस्थेतून या भागांत वीजपुरवठा करून चक्राकार पद्धतीने वीजकपात सुरू केली होती. दरम्यान, उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही या प्रकरणाचा आढावा घेतला असून, चाकण औद्योगिक विभागासाठी चार नवीन वीज उपकेंद्र उभारण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन त्यांनी पुण्यात झालेल्या बैठकीत दिले.

चाकण औद्योगिक वसाहतीतील महापारेषणचा अतिउच्चदाब ट्रान्सफार्मर मंगळवारी दुपारी निकामी झाला. त्यामुळे या भागातील मोठे आणि लघुउद्योग मिळून ४६८ ग्रामकांचा वीजपुरवठा खंडित झाला. त्याचप्रमाणे ८५० घरगुती वीजग्राहकांनाही त्याचा फटका बसला. या समस्येमुळे उद्योगांतील उत्पादनावर परिणाम झाला. महावितरण कंपनीच्या वतीने तातडीने पर्यायी व्यवस्थेतून या भागांत वीजपुरवठा पूर्ववत करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, सर्वच विभागांना पर्यायी व्यवस्थेतून वीज उपलब्ध करून देणे शक्य न झाल्याने मंगळवारपासून चक्राकार पद्धतीने वीजकपात सुरू करण्यात आली होती. बुधवारी संध्याकाळपर्यंत बहुतांश भागाला पर्यायी व्यवस्थेतून वीज उपलब्ध करून देण्यात आली असली, तरी काही भागांत वीजकपात कायम ठेवण्यात आली. पुढील दोन दिवसांनंतर काही उद्योगांमध्ये दिवाळीची सुटी असल्याने विजेची मागणी कमी होऊन परिस्थिती पूर्ववत होईल, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

दरम्यान, उद्योगमंत्री सामंत यांच्या उपस्थितीत बुधवारी चाकण येथील औद्योगिक क्षेत्रातील समस्यांबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या विभागातील वाहतूक आणि विद्युत समस्या सोडविण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या विभागासाठी नवीन वीजउपकेंद्र उभारण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही केली जाईल. त्याचप्रमाणे महावितरणकडून अधिक मनुष्यबळ दिले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. आमदार महेश लांडगे, पिंपरीचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, एमआयडीसीच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी फारोग मुकादम, मुख्य अभियंता नितीन वानखेडे, प्रादेशिक अधिकारी सचिन बारवकर, संजय देशमुख आदी बैठकीला उपस्थित होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply