पुणे :चांदणी चौकातील जुना पूल पाडण्यास आणखी आठ दिवस विलंब? ; सेवावाहिन्या स्थलांतर रखडले

पुणे : चांदणी चौकातील जुना पूल पाडण्याला आणखी आठ दिवस विलंब लागण्याची शक्यता आहे.या ठिकाणच्या विविध सेवावाहिन्या स्थलांतर करण्याचे काम रखडले आहे. पूल पाडण्याआधीची पूर्वतयारी संबंधित खासगी कंपनीकडून अंतिम टप्प्यात आहे.चांदणी चौकातील कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) चांदणी चौकातील जुना पूल पाडण्याचे नियोजन केले आहे. दिल्ली येथील कंपनीकडून त्याचे काम केले जात आहे. सध्या पूल पाडण्यासाठी आवश्यक पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आहे. मात्र,या ठिकाणच्या विविध सेवावाहिन्या स्थलांतर करण्याचे काम रखडले आहे. पुणे महापालिकेकडून त्यांच्याकडील बहुतांश सेवावाहिन्या काढण्यात आल्या आहेत. मात्र, अन्य सेवावाहिन्या स्थलांतरित करण्याबाबत महापालिकेलाच विनंती करण्यात आली आहे. या कामासाठी विलंब होत आहे. तर, दुसरीकडे जोवर सेवावाहिन्या स्थलांतरित करण्यात येत नाहीत, तोवर पूल पाडता येणार नसल्याचे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (नॅशनल हायवेज ॲथॉरिटी ऑफ इंडिया – एनएचएआय) स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, या सेवावाहिन्या स्थलांतरित करून प्रत्यक्ष पूल पाडण्यासाठी आणखी आठ दिवस लागण्याची शक्यता एनएचएआयकडून व्यक्त करण्यात येत आहे. तसेच पुलाजवळील परिसरातील स्थानिकांचे स्थलांतर, पूल पाडल्यानंतर नऊ ते दहा तासांत वाहतूक थांबविणे, पूल कोसळल्यानंतर पडलेला राडारोडा काढण्यासाठीची व्यवस्था, त्यासाठी लागणारे मनुष्यबळ आणि वाहने आदींचे प्रामुख्याने नियोजन महत्त्वाचे आहे. याशिवाय पूल पाडताना पाऊस नसणे आवश्यक आहे. अन्यथा पडणारा ओला राडारोडा उचलणे मोठे जिकिरीचे काम आहे. या सर्व कारणांमुळे प्रत्यक्ष पूल पाडण्यास आणखी आठ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply