पुणे : गॅस, वीज दरवाढीच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

केंद्रातील मोदी सरकारने ५० रुपये गॅस दरवाढ आणि राज्यातील शिंदे सरकारने वीज दरवाढ तसेच जेवणावर पाच टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ आज(सोमवार) पुण्यातील बालगंधर्व चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी गरिबी, महागाई आणि बेरोजगारी नावाचे मुखवटे घालून तरूणी आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या. यावेळी केंद्र आणि राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

या आंदोलनाचे नेतृत्व शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले. यावेळी म्हणाले की, “मागील ७५ वर्षातील सर्वात मोठी महागाई केंद्र सरकारने केली आहे. सतत पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढ करून सर्व सामन्याच जगणे मुश्किल आहे. त्यामुळे आज आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहोत. आज श्रीलंकामध्ये महागाईमुळे काय परिस्थिती झाली आहे, हे पाहून तरी केंद्र सरकारने महागाई नियंत्रणात आणावी. अन्यथा आपल्या इथे देखील अशी परिस्थिती होऊ शकते.”

तसेच, “राज्यात एकनाथ शिंदे यांचे सरकार येऊन काही तास होत नाही. तोच वीज दरवाढ करण्याचा निर्णय घेतला गेला. राज्यातील ‘ईडी’ सरकारला सत्ता स्थापन करताना जो काही खर्च झाला. त्याची वसुली सर्व सामान्य जनतेच्या वीज दरवाढीमधून करायची हे स्पष्ट झालं आहे.”, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांनी निशाणा साधला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply