पुणे : गणेशोत्सवातील गर्दीत चोरी ; आंधप्रदेशातील महिलांची टोळी गजाआड

पुणे : गणेशोत्सवातील गर्दीत महिला भाविकांकडील ऐवज लांबविणाऱ्या आंध्र प्रदेशातील महिलांच्या टोळीला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात अटक केलेल्या महिलांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडप परिसरात एका महिलेच्या पिशवीतून ४० हजारांचा महागडा मोबाइल संच लांबविल्याचे उघडकीस आले आहे.

या प्रकरणी चार महिलांना अटक करण्यात आली असून त्या मूळच्या आंध्रप्रदेशातील करनूल जिल्ह्यातील आहेत. याबाबत एका महिला भाविकाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला खराडी भागात राहायला आहे. रविवारी सायंकाळी बेलबाग चौकातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या उत्सव मंडपात महिला भाविक दर्शन घेत होती. त्या वेळी चौघींनी महिलेच्या पिशवीतून ४० हजारांचा महागडा मोबाईल संच लांबविला.

पिशवीतून मोबाईल संच चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने त्वरीत बंदोबस्तावरील पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तपास करुन चौघींनी ताब्यात घेतले. त्यांना रात्री उशीरा अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या महिलांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून पोलीस हवालदार भोसले तपास करत आहेत.

दर्शन रांगेत रोकड चोरी करणारा अटकेत
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती उत्सव मंडपात एका भाविकाच्या खिशातून दोन हजारांची रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी संदीप सुनील बोरसे (वय २७, रा. पवननगर, ता. शिरपूर, जि. धुळे) याला अटक करण्यात आली आहे. विलास निकाळजे (वय ७०) यांनी याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. निकाळजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी रांगेत थांबले होते. त्या वेळी बोरसेने गर्दीत निकाळजे यांच्या खिशातून दोन हजारांची रोकड लांबविली. निकाळजे यांच्या लक्षात रोकड चोरीचा प्रकार आल्यानंतर त्यांनी आरडाओरडा केला. बोरसेला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस हवालदार गोंजारी तपास करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply