पुणे : खासगी ट्रॅव्हलर बसच्या थांब्यांमुळे हडपसरच्या वाहतुकीचा दररोजच खोळंबा

हडपसर : येथील सोलापूर महामार्गावर धावणाऱ्या खासगी ट्रॅव्हलर बसचा पुढे लक्ष्मीकॉलनी जवळ नेलेला थांबा काही महिन्यातच पुन्हा मूळ जागी आल्याने याठिकाणी दररोजच रात्री वाहतुकीचा खोळंबा होत आहे.

या खासगी बस भरमहामार्गावर अस्ताव्यस्त थांबत असल्याने इतर वाहनचालकांना तासनतास कोंडीत अडकून पडावे लागत आहे. विधानसभेत त्यावर चर्चा होऊनही पोलिसांकडून या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे.ही परिस्थिती न बदलल्यास पोलिसांवर हक्कभंग आणण्याचा इशारा आमदार चेतन तुपे पाटील यांनी दिला आहे. हडपसरची वाहतूककोंडी हा गेली पंचवीस-तीस वर्षापासूनचा प्रश्न आहे. उड्डाणपूल, रस्ता रूंदीकरण, डायव्हर्शन, एकेरी मार्ग आदी विविध उपाययोजना करूनही येथून प्रवास करणाऱ्या वाहनांना आजही गती मिळत नाही.

पथारी व्यवसायीक, हातगाड्या, रस्त्यावर आलेले कार बाजार, हॉटेल्स व रेस्टॉरंटसमोर होणारे पार्किंग, ऑटोरिक्षांचे ठिकठिकाणी असलेले अनाधीकृत थांबे आणि रात्री नऊ ते बारा वाजण्याच्या दरम्यान मगरपट्टा चौकापासून मांजरी फाट्यापर्यंत प्रवासी घेण्यासाठी मनमानी पध्दतीने उभ्या राहणाऱ्या खासगी प्रवासी बसेस यामुळे सोलापूर महामार्गावरील या परिसरात कायमच वाहतुककोंडी होत असते.खासगी प्रवासी बस या मार्गावरुन लातूर, उस्मानाबाद, सोलापूरकडे वाहतूक करीत असतात. हडपसर परिसरासह शहराच्या विविध भागातून या ठिकाणच्या थांब्यावर प्रवासी येत असतात. त्यामुळे येथे रात्री नऊ वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत कायम ही प्रवासी वाहने एकापुढे एक निम्म्या रस्त्यावर येऊन इतर वाहनांना अडथळा निर्माण करीत आहेत.

शुक्रवार, शनिवार व रविवारी प्रवाशांचे प्रमाण चार पट असते. त्यांचे नियोजन करताना संपूर्ण रस्त्यावर प्रवास्यांचा गोंधळ उडालेला असतो. वाहतूककोंडीच्या या समस्येमुळे काही महिन्यांपूर्वी येथील खासगी प्रवासी बसथांबा लक्ष्मीकॉलनी येथे हलविण्यात आला होता.मात्र, काही दिवसातच हे थांबे पुन्हा मूळ ठिकाणी आले आहेत. हे थांबे मूळ ठिकाणी व कोणाच्या सांगण्यावरून कसे आले, असा प्रश्न दररोजच्या कोंडीशी सामना करणारे प्रवासी करीत आहेत.

दरम्यान, याबाबत नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार चेतन तुपे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करून या विषयाकडे लक्ष वेधले होते. मात्र, त्यानंतरही येथील परिस्थितीत काहीही फरक पडलेला नाही. त्यामुळे आमदार तुपे यांनी वाहतूक पोलिसांच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

"हडपसरची वाहतूकोंडी सोडवण्याबाबत वाहतूक पोलिसांची अनास्था दिसून येत आहे. त्यांना या समस्येबाबत काही देणेघेणे दिसत नाही. पुढे नेलेला थांबा कुणासाठी परत मागे आला, यामध्ये काही आर्थिक हितसंबंध आहेत की काय, अशी शंका येते. वारंवार सूचना करूनही त्याबाबत सुधारणा होत नसेल तर येत्या अधिवेशनात वाहतूक पोलिसांवर हक्कभंग आणणार आहे.'

- चेतन तुपे पाटील आमदार

येथील खासगी बसेसवर नियमित कारवाई केली जात आहे. या सर्व बससाठी टोलनाक्याजवळ पार्किंग दिले आहे. या बस धावण्याच्या काळात सहा कर्मचाऱ्यांसह मी सुरळीत वाहतुकीसाठी प्रयत्न करीत आहे. मनमानी थांबणाऱ्या वाहनांवर वेळोवेळी कारवाई केली जात आहे.'

- बाळासाहेब मुऱ्हे पोलीस अधिकारी, हडपसर वाहतूक शाखा



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply