पुणे : जमिनीची मोजणी केवळ एका तासात – एक हजार मोजणी यंत्रे (रोव्हर मशीन) भूमि अभिलेख विभागाला मेअखेरीस प्राप्त होणार

पुणे : कोणत्याही जमिनीची मोजणी केवळ एका तासात करता येणे शक्य होणार आहे. त्यासाठी तब्बल एक हजार जमीन मोजणी यंत्रे (रोव्हर मशीन) भूमि अभिलेख विभागाला मेअखेरीस प्राप्त होणार आहेत. त्याकरिता काढण्यात आलेली निविदा अंतिम टप्प्यात असून या यंत्रांच्या खरेदीसाठी शासनाने ८० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या यंत्रांच्या सहाय्याने अचूक आणि कमी वेळेत मोजणी करणे आता शक्य होणार आहे. या यंत्रांमुळे प्रत्येक जिल्ह्यात महिन्याला सरासरी २००० ते २२०० जमीन मोजणीची प्रकरणे निकाली काढता येणे शक्य होणार आहे.

जमिनीची अचूक आणि कमी वेळेत मोजणी करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने सव्‍‌र्हे ऑफ इंडियाच्या मदतीने ७७ स्थानके (कन्टिन्यूस ऑपरेशन रेफरन्स स्टेशन – कॉर्स) उभारली आहेत. या स्थानकांच्या आधारे जीपीएस मोजणी काही वेळात घेता येणार आहे. या स्थानकांमधून होणारी मोजणी रोव्हरमध्ये (यंत्र) संकलित होणार असून पडद्यावर (टॅब) हे आकडे दिसणार आहेत. जमीन मोजणीसाठी सध्या भूमी अभिलेख विभागाकडून ईटीएस यंत्राच्या सहाय्याने मोजणी करण्यात येते. जागेवर जीपीएस रीडिंग घेऊन त्या क्षेत्राचे अक्षांश व रेखांश घेतले जातात. या अक्षांश व रेखांशच्या आधारे जमीन मोजणी करणे सोयीचे ठरते. मात्र, सध्या अस्तित्वात असलेल्या तंत्रज्ञानानुसार अचूक जीपीएस रीडिंग घेण्यासाठी किमान एक तास ते चार तास लागतात.

याबाबत बोलताना भूमी अभिलेख विभागाचे अतिरिक्त आयुक्त आनंद रायते म्हणाले, ‘एक हजार रोव्हर यंत्रांसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत असून ती अंतिम टप्प्यात आहे. मे महिनाअखेपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर ही यंत्रे उपलब्ध होतील. या यंत्रांकरिता भूमी अभिलेख विभागाला ८० कोटींचा निधी प्राप्त झाला आहे.’

रोव्हरमुळे मोजणीला गती

रोव्हर यंत्र उपग्रहाच्या आधारे प्राप्त होणाऱ्या तरंगलहरीद्वारे (सिग्नल) मोजणी करावयाच्या ठिकाणाचे अक्षांश आणि रेखांश दर्शविते, त्या अक्षांश-रेखांशवरून ऑटोकॅडसारख्या संगणकप्रणालीचा (सॉफ्टवेअर) वापर करून मोजणीची पुढील प्रक्रिया केली जाते. त्यामुळे या आधुनिक मोजणी साहित्यातून मोजणीकाम सुलभ, अचूक व अत्यंत जलदगतीने होण्यास मदत होते. यापूर्वीचे मोजणी साहित्य सरळ टेबलने साधारण दहा एकर मोजणी करण्यासाठी एक दिवस वेळ लागत असे. तसेच ई. टी. एस. यंत्राच्या सहाय्याने तेवढय़ाच क्षेत्राच्या मोजणीसाठी तीन ते चार तासांचा कालावधी लागत होता. आता केवळ एका तासात किंवा त्यापेक्षा कमी वेळेत तेवढी मोजणी शक्य होणार असल्याचे रायते यांनी सांगितले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply