पुणे : कोकण, मध्य महाराष्ट्र ओलांडून मोसमी पाऊस मराठवाड्यापर्यंत; पावसाचे प्रमाण मात्र कमी, पाच दिवस हलका पाऊस

पुणे : नैर्ऋत्य मोसमी पावसाने सोमवारी (१३ जून) पुन्हा वेगवान प्रवास केला आहे. मध्य महाराष्ट्राचा जवळपास सर्व भाग व्यापून त्याने मराठवाड्याचा बहुतांश भाग व्यापला आहे. सध्या मोसमी पावसाने निम्मा महाराष्ट्र व्यापला आहे. मोसमी पावसाच्या प्रवासाची प्रगती चांगली असली, तरी दाखल झालेल्या भागामध्ये पावसाचे प्रमाण मात्र कमी असल्याचे दिसून येत आहे. पुढील पाच दिवस राज्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

मोसमी पावसाचा १० जूनला दक्षिण कोकणातून महाराष्ट्रात प्रवेश झाला. पुढील प्रवासासाठी पोषक वातावरण असल्याने त्याने दुसऱ्याच दिवशी ११ जूनला कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात प्रगती करीत थेट मुंबई-पुण्यापर्यंत धडक मारली. पालघर, ठाणे जिल्ह्यातही त्याने प्रवेश केला. १२ जूनला मात्र त्याचा प्रवास थांबला होता. १३ जूनला पुन्हा त्याने वेग घेतला. आता मोसमी पावसाने कोकणमधील सर्व भाग व्यापला असून, कोकण किनारपट्टीवरून तो थेट गुजरातमध्ये दाखल झाला आहे. महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्र व्यापून त्याने मराठवाड्यापर्यंत मजल मारली आहे. मोसमी पावसाच्या प्रवासाला वेग असला, तरी राज्यात पावसाचे प्रमाण मात्र कमी आहे. मोसमी पाऊस दाखल झालेल्या भागात तुरळक सरींचीच हजेरी आहे. सोमवारी कोल्हापूर, महाबळेश्वर आदी भागांत तुरळक पावसाची नोंद झाली.

बंगालच्या उपसागराच्या बाजूनेही मोसमी पावसाने प्रगती सुरू केली आहे. या बाजूने ३ जूनपासून मोसमी पावसाचा प्रवास थांबला होता. मात्र, शुक्रवारी त्याने प्रगती करीत बिहारमध्ये प्रवेश केला. सध्या पूर्वोत्तर राज्यांमध्ये पावसाची हजेरी आहे. मध्य भारतात पूर्वमोसमी पाऊस होत आहे. महाराष्ट्रात पुढील पाच दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. कोकणात बहुतांश भागात सरींची शक्यता आहे. त्याचप्रमाणे विदर्भात दोन दिवस विजांच्या कडकडाटासह पूर्वमोसमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मोसमी पावसाने सध्या कोकणचा सर्व भाग व्यापला आहे. पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर आदी भागांत तो ११ जूनला पोहोचला होता. १३ जूनला त्याने नाशिक, जळगाव, धुळे, नगर, सोलापूर,, सांगली, नंदूरबार, औरंगाबाद, उस्मानाबाद, परभणी, जालना, लातूर, बीड आदी जिल्ह्यांपर्यंत मजल मारली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील ४८ तासांत मराठवाड्यातील बहुतांश भाग व्यापून तो विदर्भात प्रवेश करण्याची शक्यता आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply