पुणे – केंद्रीय जीएसटीच्या अधिक्षकास लाच घेताना सीबीआयकडून अटक

 

पुणे - बारामती येथील केंद्रीय वस्तु आणि सेवा कर विभागाच्या (जीएसटी) (GST Department) अधिक्षकास (Superintendent) पाच हजार रुपयांची लाच घेताना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) (CBI) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी अटक केली. संबंधित अधिक्षक हा एका कंपनीचा अहवाल सकारात्मक देण्यासाठी कंपनीच्या मालकाकडून पाच हजार रुपयांची लाच घेत होता. दरम्यान, या अधिकाऱ्याला सीबीआयच्या विशेष न्यायालयाने 22 एप्रिल पर्यंत कोठडी सुनावली आहे.

कुलदीप शर्मा असे अटक केलेल्या जीएसटी अधिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी कंपनीच्या मालकाने "सीबीआय'च्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे. तक्रारदाराच्या बारामती परिसरात दोन कंपन्या आहेत. या कंपनीच्या कागदपत्रांची पडताळणीचे काम जीएसटी अधिक्षक कुलदीप शर्मा याच्याकडे आले होते. संबंधीत कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर सेवा कराबाबत कंपनीचा सकारात्मक अहवाल पाठविण्यासाठी शर्मा याने तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांची लाच मागितली होती.

मात्र लाच देणे तक्रारदारास मान्य नसल्याने त्यांनी याप्रकरणी "सीबीआय'च्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून त्यांच्याकडे तक्रार दिली. त्यानुसार, त्यांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीची पडताळणी करून मंगळवारी सापळा रचला. त्यावेळी शर्मा यास तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. त्यास अटक केल्यानंतर पथकाने त्याच्या बारामती येथील अंबीकानगर येथील श्री हाईट्‌स येथील घरातुन काही महत्वाची कागदपत्रे जप्त केली आहे.

दरम्यान, शर्मा यास बुधवारी "सीबीआय'च्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी शर्माकडे त्याने केलेल्या गुन्ह्याबाबत चौकशी करायची आहे, त्याच्या आवाजाचे नमुने तपासायचे आहेत, त्यासाठी त्यास तीन दिवसांची कोठडी देण्याची मागणी "सीबीआय'च्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस निरीक्षक शीतल शेंडगे यांनी केली होती. न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्‍तीवाद ग्राह्य धरून शर्माला 22 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली. याबाबतचा आदेश विशेष न्यायाधीश गिरीष भालचंद्र यांनी दिला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply