पुणे : कामामुळे खराब झालेले रस्ते दुरुस्तीची जबाबदारी मेट्रोची ; महापालिकेचे महामेट्रोला आदेश

पुणे : मेट्रो मार्गिका आणि स्थानकांचे काम करताना खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्तीची जबाबदारी महामेट्रोची आहे. त्यामुळे मेट्रो स्थानक आणि ज्या ठिकाणी मेट्रो मार्गिकेचे काम सुरू आहे, त्या ठिकाणचे रस्ते तातडीने दुरुस्त करावेत, असे आदेश महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी महामेट्रोला दिले. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडूनही (पीएमआरडीए) मेट्रो मार्गिकेचे काम करताना खराब झालेले रस्ते दुरुस्त करावेत, अशी सूचनाही विक्रम कुमार यांनी केली.

पावसामुळे शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. शहरात सध्या काही भागात मेट्रो मार्गिकांची आणि मेट्रो स्थानकांची कामे वेगाने सुरू आहेत. मेट्रोच्या कामामुळे काही रस्ते खराब झाले आहेत. त्यामुळे हे रस्ते महामेट्रोनेच दुरुस्त करावेत, असा निर्णय यापूर्वी झाला आहे. मात्र मेट्रोकडून रस्तेदुरुस्ती केली जात नसल्याची तक्रार महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही महापालिका आणि महामेट्रोने वाद न घातला तातडीने रस्ते दुरुस्त करावेत, अशी सूचना केली होती.

या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी महापालिकेच्या पथ विभागाचे अधिकारी आणि महामेट्रोचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली. त्या वेळी मेट्रोच्या कामामुळे खराब झालेल्या रस्त्यांची जबाबदारी महामेट्रोचीच असल्याचे आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले.मेट्रोच्या कामाला परवानगी देतानाच मेट्रो स्थानकाच्या खालील बाजूचा १४० मीटर आणि स्टेशनच्या दोन्ही बाजूला २०० मीटरपर्यंत असे एकूण ५४० मीटरपर्यंतच्या रस्त्यांची देखभाल दुरुस्ती मेट्रोने करावी असे ठरलेले आहे, पण रस्तेदुरुस्ती होत नसल्याची बाब महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या बैठकीत निदर्शनास आणून दिली.

मेट्रोच्या अधिकाऱ्यांनीही त्यांची भूमिका मांडली. त्यावर आयुक्तांनी सध्या जेथे डांबरी रस्त्यांना किंवा सिमेंटच्या रस्त्यांना खड्डे पडले आहेत, ते दुरुस्त करून घ्या, असा आदेश महामेट्रोला दिला. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या प्रस्तावित मेट्रो मार्गिकेच्या कामांमुळे शिवाजीनगर ते बाणेर या दरम्यानच्या रस्त्यांची दुरुस्ती पीएमआरडीएने करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply