पुणे : ‘कसब्या’साठी भाजपकडून पाच नावांची शिफारस; शैलेश आणि कुणाल टिळक यांचा समावेश

पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून पाच जणांच्या नावांची शिफारस करण्यात आली असून त्यामध्ये दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश आणि चिरंजीव कुणाल यांचा समावेश आहे.या नावांबरोबरच माजी सभागृह नेते धीरज घाटे, गणेश बीडकर आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांच्याही नावांची शिफारस करण्यात आली आहे. केंद्रीय संसदीय समितीकडून पाच दिवसांत नाव निश्चित केले जाणार आहे. त्यामुळे कसब्यातून कोणाला संधी मिळणार, याबाबत भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.येत्या दोन फेब्रुवारीपर्यंत उमेदवाराचे नाव निश्चित केले जाणार असून निवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजपकडून राजकीय पक्षांना तसे अधिकृत विनंतीपत्र देण्यात येणार आहे.

पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने रणनीती निश्चित केली असून कसब्यातील एका नगरसेवकाला एक शक्तिकेंद्र दिले जाणार आहे. तसेच भाजपने केलेली विकासकामांची माहिती पत्रकाद्वारे प्रत्येक घरात पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.कसबा पोटनिवडणुकीसाठी येत्या २६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने भाजपकडून कसबा विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी, माजी नगरसेवकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पालकमंत्री, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीत निवडणुकीच्या दृष्टीने चंद्रकांत पाटील यांनी काही सूचना केल्या.

कसबा विधानसभा निवडणुकीसाठी शक्ती केंद्रावर भाजपची भिस्त राहणार आहे. बूथ समिती पदाधिकाऱ्यांनाही या बैठकीत काही सूचना करण्यात आल्या. भाजपने सत्ता काळात केलेल्या विविध विकासकामांची माहिती कसबा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक घरात पोहोचविली जाणार आहे. या माध्यमातून किमान तीन लाख मतदारांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

दरम्यान, निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपकडून राजकीय पक्षांना पत्राद्वारे अधिकृत विनंती करण्यात येणार आहे. त्यासाठी आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. निवडणूक बिनविरोध करायची की नाही, हे राजकीय पक्ष ठरवतील. मात्र निवडणूक बिनविरोध होईल, या अपेक्षेने भाजप गाफील राहणार नाही. त्या दृष्टीनेच पूर्वतयारीची ही बैठक होती, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.बैठकीनंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची नावे प्रदेश भाजपकडे पाठविण्यात आली आहेत. इच्छुक उमेदवारांमधून तीन नावे निश्चित करून प्रदेश भाजपकडून ती केंद्रीय संसदीय समितीला पाठविली जातील. यातील एक नाव निश्चित होईल. ही प्रक्रिया दोन फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होईल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांपैकी एकाला उमेदवारी दिल्यास निवडणूक बिनविरोध होईल, अशी भूमिका राजकीय पक्षांनी घेतली आहे. मात्र उमेदवार कोण असेल, हे दिल्लीतूनच ठरेल, याचा पुनरूच्चार पाटील यांनी केला.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply