पुणे : कर्मचाऱ्यास पिस्तुलाचा धाक दाखवुन 17 लाख रुपये लुटले

पुणे : सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी नांदेड येथील सराफी व्यावसायिकाने पाठविलेल्या कर्मचाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवून चोरट्यांनी त्याच्याकडून 17 लाख 58 हजार रुपयांची रोकड चोरुन नेली. हि घटना 7 मार्चला सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास स्वारगेट येथील वेगा सेंटरजवळच्या परिसरात घडली. याप्रकरणी सराफी व्यावसायिकाने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड येथील सराफी व्यावसायिक पुण्यातील सोने-चांदीच्या बाजारपेठेतुन शुद्ध सोने खरेदी करतात. त्यांनी नेहमीप्रमाणे त्यांच्या सराफी पेढीतील कर्मचाऱ्याला सोने खरेदीसाठी पुण्यात पाठविले होते. त्याला सोने खरेदीसाठी 17 लाख 58 हजार रुपयांची रोकड दिली होती. त्यानुसार, संबंधित कामगार 6 मार्चला रात्री नांदेड येथुन खासगी प्रवासी बसने पुण्याला निघाला. त्यानंतर 7 मार्चला सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास तो स्वारगेट येथील वेगा सेंटर इमारतीजवळ उतरला. तेथून काही अंतरावरच आरोपी कारमध्ये थांबले होते. त्यावेळी कारमधील चौघांनी कर्मचाऱ्यास अडविले. आम्ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कर्मचारी असल्याची त्यांनी बतावणी करून त्यास कारमध्ये बसण्यास सांगितले. मात्र कामगारास संशय आल्याने त्याने त्यांना विरोध करुन आरडाओरडा करण्यास सुरूवात केली. त्यावेळी एकाने कर्मचाऱ्यास पिस्तुलाचा धाक दाखवून त्यास जबरदस्तीने कारमध्ये बसविले. त्यानंतर त्याचे हात, पाय बांधून तोंडाला चिकटपट्टी लावली. त्यानंतर कर्मचाऱ्याकडील 17 लाख 58 हजार रुपयांची रक्कम जबरदस्तीने काढून घेत कामगाराला काही अंतरावर नेऊन सोडून दिले. या घटनेमुळे घाबरलेल्या कामगाराने या घटनेची माहिती त्याच्या मालकास दिली. त्यानंतर संबंधित सराफी व्यावसायिकाने पुण्यात येऊन स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल रसाळ करीत आहेत. "सराफी कर्मचाऱ्याकडील रोकड लुटण्याच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध सुरु आहे. काही महत्वाचे धागेदोरे हाती लागले असून लवकरच तपास पुर्ण होईल.'' -अशोक इंदलकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, स्वारगेट पोलिस ठाणे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply