पुणे : आता किंचित थंडीसह उन्हाचा चटकाही ; आजपासून राज्यात बहुतांश भागांत निरभ्र आकाश

पुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा राज्यातील परतीचा प्रवास अंतिम टप्प्यात असताना रविवारपासून (२३ ऑक्टोबर) राज्यातील बहुतांश भागात आकाशाची स्थिती निरभ्र होणार आहे. परिणामी दिवाळीच्या कालावधीत हलकी थंडी अवतरण्याबरोबरच उन्हाचा हलका चटकाही जाणवण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांच्या आत मोसमी वारे राज्याचा निरोप घेणार आहेत. राज्यातून १४ ऑक्टोबरला मोसमी वाऱ्यांच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे. त्यापूर्वी काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत परतीच्या पावसाची हजेरी लागली आहे. गेल्या आठवडय़ात परतीचा प्रवास वेग धरत असतानाच अरबी समुद्रातून मोठय़ा प्रमाणात बाष्प आल्याने पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाडय़ातील काही भागांत जोरदार पाऊस झाला. या प्रणालीमुळे राज्यातून मोसमी वाऱ्यांच्या परतीच्या पावसाला विलंब झाला. मात्र, सध्या वातावरणात पुन्हा बदल झाला आहे.

त्यातून राज्याकडे येणाऱ्या बाष्पाचे प्रमाण घटले आहे. त्यातून बहुतांश भागांत कोरडय़ा हवामानाची स्थिती निर्माण होऊन पाऊस थांबला आहे. विदर्भातील जवळपास सर्वच भागात सध्या आकाशाची स्थिती निरभ्र होत आहे. उत्तर महाराष्ट्रातही कोरडय़ा हवामानाची स्थिती आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातही बहुतांश भागात पुढील दोन दिवसांच्या आत कोरडय़ा हवामानाची स्थिती निर्माण होणार असून, या कालावधीत मोसमी वारे राज्याचा निरोप घेतील. पावसाळी वातावरणामध्ये राज्यात बहुतांश भागात दिवसाचे कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत घटले होते. रात्रीचे किमान तापमानात मात्र वाढ झाली. त्यामुळे दिवसा उन्हाचा चटका आणि रात्री थंडी नव्हती. पावसाळी स्थिती दूर होऊन कोरडे हवामान आणि निरभ्र आकाशाची स्थिती तयार होणार असल्याने आता रात्रीच्या किमान तापामानात घट होऊन हलकी थंडी जाणवेल. त्याचप्रमाणे दिवसाच्या कमाल तापमानात वाढ होऊन उन्हाचा चटका काही प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply