पुणे : अलंकापुरीत आज कार्तिकीचा सोहळा; राज्यभरातून हजारो वारकरी आळंदीत दाखल

पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या संजीवन समाधी सोहळ्यांतर्गत अलंकापुरीमध्ये रविवारी (२० नोव्हेंबर) कार्तिकी यात्रेचा सोहळा साजरा होणार आहे. त्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत. मंगळवारी (२२ नोव्हेंबर) माउलींचा संजीवन समाधी दिन सोहळा भक्तिमय वातावरणात होणार असल्याचे आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी सांगितले.

करोनाचे सावट दूर झाल्याने यंदा सोहळ्यासाठी मोठी गर्दी होणार असल्याचे लक्षात घेऊनच नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार यंदा भाविक मोठ्या संख्येने आळंदीत दाखल झाले आहेत. त्यामुळे इंद्रायणीच्या तीरावर आणि एकूणच अलंकापुरीमध्ये भक्तिचैतन्याचा संचार झाल्याचे चित्र आहे. परिसरातील मठे, मंदिरे, धर्मशाळा येथे हरिनामाचा गजर सुरू झाला आहे. ज्ञानेश्वरी पारायण, भजन, कीर्तन, हरीजागर सेवा भक्तिमय उत्साहात सुरू आहे. आळंदी देवस्थान, आळंदी नगरपरिषद, आरोग्य सेवा, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन यांनी आपापल्या विभागाचे माध्यमातून जोरदार तयारी करून भाविकांच्या स्वागताची सज्जता ठेवली आहे.

आळंदी मंदिरातील प्रथा-परंपरांचे पालन करीत कार्तिकी यात्रेत नित्यनैमित्तिक धार्मिक कार्यक्रम मंदिरात सुरू करण्यात आले आहेत. रविवारी ( २० नोव्हेंबर) पहाटेपासून विविध धार्मिक विधी होतील. त्यात माउलींच्या समाधीवर पवमान अभिषेक, दुधारती तसेच वेदमंत्र आणि महानैवेद्याचा विधी होईल.

आळंदी विकासासाठी पहिल्या टप्प्यात २५ कोटी रुपयांचा निधी देण्याची ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. पाटील यांनी शनिवारी आळंदी मंदिरास भेट देत माउलींचे दर्शन घेतले. त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली. पाटील म्हणाले,की सुमारे ४०० एकर वरील जागेवर देवस्थानने विविध विकास कामांसाठी आराखडा केला आहे. या कामांसाठी निधी दिला जाईल.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply