पुणे – अजूनही वेळ गेलेली नाही, शिवसेनेने भाजपसोबत यावे; रामदास आठवलेंचा सल्ला

पुणे - "बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी उद्धव ठाकरे यांना काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर कधीच जाऊ दिले नसते. अडीच-अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्याचा विचार करून उद्धव ठाकरे यांनी भाजपाबरोबर यावे. त्यासाठी अजूनही वेळ गेलेली", असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी (ता.11) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले. पुण्यात एका कार्यक्रमात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मशिदीवर असलेल्या भोंग्याबाबत त्यांचे मत विचारले असता आठवले म्हणाले, "राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेशी मी सहमत नाही. विरोधाला विरोध योग्य नाही. राज ठाकरे नाही तर उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे वारसदार आहेत. ते पुन्हा आमच्याबरोबर येण्याचा निर्णय बदलत नाही, याचं वाईट वाटतं. उद्धव ठाकरे यांनी त्यांचा विचार बदलून आमच्याबरोबर सत्तेत यावे.

राम नवनी ही अत्यंत पवित्र मानली जाते. त्यामुळे त्यादिवशी नॉनव्हेज न खाण्याची भूमिका योग्य आहे. मात्र त्यास हिंसक पद्धतीने विरोध करणे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे जे कोणी हल्ल्याच्या घटनेचे जबाबदार आहेत त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई व्हायला हवी, असे आठवले म्हणाले.

शरद पवार यांच्या घरी हल्ला होणार आहे, याची माहिती पोलिसांना नव्हती का? असा सवाल उपस्थित करत आठवले यांनी या हल्ल्यास राज्य सरकारच जबाबदार असल्याचा आरोप केला. राज्य सरकारने एसटी कामगारांच्या भावनेचा विचार करायला हवा, त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. मात्र एसटी कामगारांच्या भावनांचा विचार न केल्याने त्यांचा उद्रेक झाला आणि त्यातून हा हल्ला झाला आहे. परंतु अशा प्रकारचा हल्ला करणे योग्य नाही. हल्ल्यात सहभागी असलेल्या कामगारांना कामावर न घेण्याची भूमिका देखील चुकीची आहे," असे आठवले म्हणाले.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply