पुणे : अखेर थेऊर रस्त्याच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा

लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्ग ते थेऊर गाव या चार किलोमीटर रस्त्याच्या साडेपाच मिटर रुंद रस्ता दुरुस्ती करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागास न्यायालयाने परवानगी दिली आहे. या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेऊन रस्ता दुरुस्ती व डांबरीकरणाच्या कामास सोमवारी (ता. ०२) सुरुवात करीत असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई यांनी दिली आहे.

दरम्यान, न्यायालयाने पुणे सोलापूर रोड ते थेऊर गाव रस्ता या चार किलोमीटर रस्त्याची रुंदी ५ जून पर्यंत मोजणीचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या आहेत. या मोजणीचा अहवाल मिळाल्यानंतर रस्ता हा रस्ता १० ते १२ मीटर रस्ता रुंदीकरनास न्यायालयाकडून परवानगी मिळणार असल्याची शक्यता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

स्थानिक शेतकऱ्यांनी रस्त्यात जाणाऱ्या जागेचा मोबदला मिळावा, नुकसान भरपाई मिळावी व सदरचा रस्ता नकाशात नसल्याने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. त्यामुळे रस्त्याचा प्रश्न सद्य स्थितीत न्यायप्रविष्ट आहे. मुख्य रस्ता खड्डेमय झाल्यामुळे अनेक भाविक तसेच स्थानिक गावातील नागरिक पर्यायी रस्ता म्हणून तारमळा मार्गे थेऊर रस्त्याचा वापर करतात. हा रस्ता आधीच अरुंद असून दोन वाहने बसणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. रस्त्यामध्ये शेतजमीन गेलेल्या शेतक-यांना नुकसान भरपाई मिळणे गरजेचे आहे. तो त्यांचा आधिकार आहे. मागील काही दिवसांपासून या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले असून हा रस्ता झाल्यास होणारे अपघात टळणार आहेत. व थेऊरकरांचा प्रवास सुसाट होणार आहे.

याबाबत माहिती देताना बारभाई म्हणाले, " पुणे सोलापूर रोड ते थेऊर गाव या रस्त्याची झालेली दुरावस्था व या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन हा रस्ता साडेपाच मीटर रुंदीचे दुरुस्ती व डांबरीकरण करण्यास काही अटींवर परवानगी दिली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने सोमवारी सुरू करण्यात येणार आहे. तसेच या रस्त्याची रुंदी तटस्थ शासकीय यंत्रणामार्फत मोजणी करण्यात येणार असून याचा अहवाल न्यायालयाला ५ जूनच्या आत देण्यात येणार आहे. हा अहवाल न्यायालयाला प्राप्त झाल्यानंतर रस्त्याची रुंदी किती वाढणार यावरचा आदेश न्यायालय देणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची रुंदी १० ते १२ मीटर असल्याचे न्यायालयाला कळवले असले तरी, न्यायालय रुंदीकरणाबाबत देईल तो आदेश शासनाला मान्य असणार आहे.

याबाबत बोलताना आमदार अशोक पवार म्हणाले की, थेऊर रस्त्याचे काम सुरू करण्याबाबत न्यायालयाने दिलेला निर्णय स्वागतार्ह आहे. या रस्त्याबाबत शेतकऱ्यांनी न्यायालयात याचिका दाखल केल्याने हे काम मागील तीन वर्षापासून रखडले होते. याबाबत शेतकऱ्यांची अनेक वेळा चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला होता. त्याला अखेर यश आले आहे. हे काम आज सोमवारपासून (ता.२) सुरू करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या असून, होणारे काम दर्जेदार कसे होईल. याकडेही या पुढीलकाळात लक्ष ठेवणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply