पुणेकरांचे प्रेम कायम स्मरणात राहील !; मावळते पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भावना

पुणेकरांचे प्रेम कायम स्मरणात राहील. पुण्यात काम करताना नागरिकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले. शहराचा वाढता विस्तार, वाहतुकीचा वाढता ताण, शहराची रचना अशा अनेक बाबी विचारात घेऊन वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले. गुन्हेगारांना जरब बसविण्यासाठी मोक्का तसेच झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई केली. वाहतूक समस्या सोडविण्यासाठी विविध यंत्रणांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत मावळते पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी बुधवारी व्यक्त केले.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची मंगळवारी रात्री बदली करण्याचे आदेश गृहविभागाने दिले. गुप्ता यांची राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागात अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली. गुप्ता यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधला. पुण्यात काम करताना नागरिकांनी सहकार्य केले. गणेशोत्सव आणि पालखी सोहळ्याचा बंदोबस्ताचा अनुभव शब्दांत सांगता येत नाही. गणेशोत्सव आणि पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात. गर्दीचे व्यवस्थापन करणे सोपे नाही, असे गुप्ता यांनी सांगितले.

पुणे शहर साहित्य, कला, सांस्कृतिक क्षेत्रात नावाजलेले आहे. पुणेरी पाट्या आाणि पुणेकरांच्या उपहासात्मक टीकेबद्दल ऐकले होते. मात्र, पुण्यात काम करताना कधीही उपहासात्मक टीकेला सामोरे जावे लागले नाही. पुणेकरांनी कायम सहकार्य केले. गुंड टोळ्यांना जरब बसविण्यासाठी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) तसेच झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये गुंडांच्या विरोधात कारवाई करण्यात आली. आकडेवारीपेक्षा कारवाईला महत्त्व दिले. गु्न्हेगारी टोळ्यांच्या हालचालीवर सातत्याने करडी नजर ठेवून त्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी पोलीस कर्मचारी, अधिकारी वर्गाने मेहनत घेतली, असे त्यांनी सांगितले.

वाहतूक समस्या सोडविण्यास प्राधान्य
पुण्यातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले. वाहतूक कोंडवरून टीका झाली. शहरातील अरुंद रस्ते, वाहनांची वाढती संख्या आणि अपुरे मनुष्यबळ या बाबी विचारात घेऊन वाहतूक विषयक सुधारणा करण्यात आल्या. वाहतूक समस्या सोडविण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.

भरती प्रक्रियेतील गैरव्यवहाराच्या सखोल तपासाचे समाधान
आरोग्य विभाग भरती, म्हाडा प्रश्नपत्रिका फूट, लष्करी भरती प्रश्नपत्रिका फूट तसेच आभासी चलन प्रकरणातील फसवणूक प्रकरणाचा तपास केला. या गुन्ह्यांचा सखोल तपास करण्यात आला. तपास करताना राजकीय दबाब किंवा हस्तक्षेप झाला नाही. गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यात आली, असे गुप्ता यांनी नमूद केले.

पुण्यात आणखी पोलीस ठाण्यांची गरज
पुणे शहराचा वाढता विस्तार पाहता मनुष्यबळ अपुरे आहे. पुण्यात आणखी पोलीस ठाण्यांची निर्मिती व्हायला हवी, असे गुप्ता यांनी सांगितले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply