पिनाका एमके १ रॉकेट प्रणालीची सुधारित आवृत्तीची यशस्वी चाचणी

पुणे : पिनाका एमके १ रॉकेट प्रणालीची सुधारित आवृत्ती (ईपीआरएस) आणि पिनाका एरिया डिनायल म्यूनिशन्स रॉकेट प्रणालीची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि सैन्यदलाच्या वतीने यशस्वी चाचणी घेण्यात आली. ही चाचणी राजस्थानमध्ये पोखरण येथे झाली. या यशस्वी चाचणीसाठी डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. जी सतीश रेड्डी यांनी सहभागी चमूचे अभिनंदन केले.

डीआरडीओच्या पुण्यातील सशस्त्र संशोधन आणि विकास आस्थापण (एआरडीई) प्रयोगशाळेने हाय एनर्जी मटेरिअल रिसर्च लॅबोरेटरी (एचईएमआरएल) प्रयोगशाळेच्या साहाय्याने ही पिनाका रॉकेट प्रणाली विकसित केली आहे. गेल्या १५ दिवसांमध्ये चाचणी दरम्यान सुमारे २४ ईपीआरएस अग्निबाण डागण्यात आले असून यामध्ये अचूकता आणि इतर बाबींची सर्व उद्दिष्टे पूर्ण करण्यात आली. पिनाका रॉकेट प्रणालीत वापरल्या जाणाऱ्या शस्त्रसाठा आणि फ्यूजच्या विविद प्रकारांची सुद्धा यावेळी चाचणी करण्यात आली. चाचण्यांसह ईपीआरएस तंत्रज्ञान उद्योगाद्वारे आत्मसात करण्याचा प्रारंभिक टप्पा यशस्वीपणे पूर्ण झाला असून ही रॉकेट प्रणाली उद्योग भागीदारांद्वारे उत्पादनासाठी तयार आहेत.

गेल्या दशकापासून लष्कराच्या सेवेत असलेल्या पिनाकी ईपीआरएस ही सुधारित आवृत्ती आहे. उदयोन्मुख गरजा पूर्ण करण्यासाठी पिनाकाची क्षमता वाढविणाऱ्या प्रगत तंत्रज्ञानासह प्रणाली अद्ययावत केली गेली आहे. या तंत्रज्ञानाला डीआरडीओतर्फे म्यूनिशन्स इंडिया लिमिटेड (एमआयएल) आणि नागपूरच्या इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्ह लिमिटेडला हस्तांतरित करण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान एमआयएलद्वारे उत्पादित रॉकेटची चाचणी घेण्यात आली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply