पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स मेट्रो रेल्वे मार्ग ‘रुळावर’ ; बारा किलोमीटर लांबीच्या मार्गाचे काम पूर्ण ; चाचणीनंतर लवकरच प्रवासी सेवा

मेट्रो प्रकल्पाच्या पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स या बारा किलोमीटर लांबीचा मार्ग पूर्ण झाला आहे. या उन्नत मार्गिकेसाठीचे दोन खांब एकमेकांना जोडण्याची प्रक्रिया (सेगमेंट) पूर्ण झाली असून येत्या काही दिवसांत मार्गिकेवर मेट्रोची चाचणी घेऊन फुगेवाडी ते शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय या दरम्यानची प्रवासी सेवा लवकरच सुरू होणार आहे.दरम्यान, फुगेवाडी ते शिवाजीनगर सत्र न्यायालय या मार्गातील कामे तीन नोव्हेंबरपर्यंत, तर गरवारे महाविद्यालय ते शिवाजीनगर सत्र न्यायालय या टप्प्यातील कामे ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होतील, असा दावा महामेट्रोकडून करण्यात आला आहे.

मेट्रो प्रकल्पाच्या पिंपरी-चिंचवड महापालिका ते स्वारगेट या मार्गिकेमधील पिंपरी-चिंचवड महापालिका स्थानक ते रेंजहिल्स स्थानक या बारा किलोमीटर उन्नत अंतरातील शेवटचे दोन खांब एकमेकांना जोडण्याची (सेगमेंट) प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपािलका स्थानक ते रेंजहिल्स स्थानक या १२ किलोमीटर अंतरामध्ये एकूण ३ हजार ९३४ सेगमेंट आहेत. या सेगमेंटद्वारे ४५१ स्पॅन उभारण्यात आले आहेत. या मार्गावरील मेट्रोचा पहिला खांब ७ ऑक्टोबर २०१७ मध्ये उभारण्यात आला. सेगमेंट उभारणीसाठी नाशिक फाटा येथे कास्टिंग यार्डची उभारणी करण्यात आली.
हा बारा किलोमीटर उन्नत मार्ग पूर्ण करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. संरक्षण विभागाकडून हॅरिस पूल ते खडकी येथील जागा मिळविण्यासाठी सातत्याने महामेट्रोला पाठपुरावा करावा लागला. तीन महिन्यांपूर्वी ही जागा महामेट्रोच्या ताब्यात आली. मात्र त्यानंतरही काम न थांबविता रेंजहिल्स स्थानक ते खडकी आणि फुगेवाडी स्थानक ते हॅरिस पूल या टप्प्याची कामे महामेट्रोकडून सुरू ठेवण्यात आली.

उन्नत मार्गिकेतील शेवटचे दोन खांब जोडण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याने पुढील काही दिवसांत मेट्रोची प्रत्यक्ष प्रवासी सेवा सुरू होणार आहे. या मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आले असून येत्या काही दिवसांत मेट्रोची चाचणी घेतली जाईल, अशी माहिती मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डाॅ. ब्रिजेश दीक्षित यांनी दिली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply