पिंपरी- चिंचवडमध्ये राष्ट्रवादीत दुफळी? जगताप कुटुंबीयांना उमेदवारी दिल्यास बिनविरोध निवडणूक करण्याची पक्षातील आमदाराची भूमिका

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक लढवण्याबाबत स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही असताना राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी मात्र जगताप कुटुंबीयांना उमेदवारी दिल्यास पोटनिवडणूक बिनविरोध करावी, अशी प्रतिक्रिया लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना दिली आहे. दिवंगत लक्ष्मण जगताप यांनी राष्ट्रवादी पक्षाचे काम केले आहे. अनेक पद त्यांनी राष्ट्रवादी पक्षात असताना भूषविली आहेत. त्यामुळे, त्यांना राष्ट्रवादी पक्षाने पाठिंबा दिला पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केली आहे. 

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे नुकतेच दुर्धर आजाराने निधन झाले. ते चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. त्यांचे निधन झाल्याने आमदारकीची जागा रिक्त झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली असून २७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. पिंपरी- चिंचवड शहरात राजकारण रंगायला सुरुवात झाली आहे. भाजपकडून दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप किंवा बंधू शंकर जगताप यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली असून, पोटनिवडणूक लढवण्यावर भर दिला आहे.

आम्ही निवडणूक लढवणार असल्याचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी स्पष्ट केले असून, शेवटी पक्षश्रेष्ठी निर्णय घेईल, असे त्यांनी म्हटले होते. असे असताना राष्ट्रवादीचे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांनी मात्र वेगळी भूमिका घेतली आहे. जगताप यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी दिल्यास राष्ट्रवादीने पाठिंबा द्यावा आणि ही पोटनिवडणूक बिनविरोध करावी, अशी अपेक्षा बनसोडे यांनी व्यक्त केली आहे. यामुळे स्थानिक राष्ट्रवादीत दुफळी निर्माण झाली आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पोटनिवडणुकीबाबत राष्ट्रवादी पक्षश्रेष्ठी निर्णय घेणार असून, ही पोटनिवडणूक अधिक रंगतदार होणार हे मात्र नक्की. 

आमदार अण्णा बनसोडे म्हणाले की, जगताप कुटुंबीयांपैकी कोणालाही भाजपने उमेदवारी दिल्यास ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, या मताचा मी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला पाहिजे. दिवंगत लक्ष्मण जगताप यांनी राष्ट्रवादी पक्षाचे काम केले आहे. जगताप यांच्या कुटुंबीयांपैकी कोणी निवडणूक लढवली नाही तर राष्ट्रवादीने ही निवडणूक लढवावी. पण, दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप असतील किंवा बंधू शंकर जगताप यांना उमेदवारी मिळाली तर ही निवडणूक बिनविरोध व्हायला हवी. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply