पंढरपूरचा रखडलेला विकास कधी मार्गी? ; लाखो भाविक, स्थानिकांच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अपेक्षा

पंढरपूर : लाखो वैष्णवांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरचा विकास म्हणावा असा अद्याप झालेला नाही. आषाढी, कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेला मंत्री येतात आणि विकासाची आश्वासने देतात. पंढरपूरच्या विकासासाठी प्राधिकरण स्थापन करणे, तीर्थक्षेत्र विकास आराखडा, नमामी चंद्रभागा, परदेशी गुंतवणूकदारांकडून विकास, एमआयडीसी आणि आता नव्याने काशी कॉरिडॉरच्या धर्तीवर पंढरपूर कॉरिडॉर करणार, असे अनेक आश्वासने दिली गेली. मात्र पंढरपूरचा विकास अद्यापही रखडलेलाच आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी शुक्रवारी पंढरीत येत आहेत. या पार्श्वभूमीवर लाखो भाविक तसेच स्थानिकांच्या फडणवीसांकडून रखडलेले विकास मार्गी लागावा ही माफक अपेक्षा आहे.

राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक पंढरीच्या सावळय़ा विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतो. गेल्या काही वर्षांत पंढरीत येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे शहर आणि मंदिर परिसरात भाविकांची गर्दी दिसून येते. आषाढी, कार्तिकी एकादशीच्या महापूजेसाठी आलेले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच एरव्ही दर्शनासाठी आलेले केंद्रातील, राज्यातील मंत्री, विरोधी पक्ष नेते हे कायम भरभरून आश्वासने देतात. लाखो भाविकांची मतपेढी डोळय़ासमोर ठेवून विकासाचे चित्र  रंगविले जाते. सत्ता बदलल्यावर नव्याने आश्वासने दिली जातात. 

पंढरपूरचा समग्र विकास करण्यासाठी पंढरपूर प्राधिकरणाची स्थापना २००९ साली झाली. यात शहर व परिसराचा विकासांबाबत एक आराखडा तयार केला. तो पुढे लालफितीत अडकला. पुढे तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्यात आला. यामध्ये शहर, मंदिर परिसर, नदी, घाट, सुशोभीकरण आदींचा समावेश केला. त्यानंतर म्हणजे २०१३ साली संत तुकाराम जन्मचतुश्ताब्दी योजना तयार करण्यात आली. ही योजनासुद्धा रखडली. त्यानंतर सत्तांतर होऊन नमामी गंगेच्या धर्तीवर नमामी चंद्रभागा योजना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात जाहीर झाली. त्याच वर्षी कॅनडा येथील उद्योजक आणि राज्य, केंद्र सरकार यांच्या सहकार्याने ‘स्मार्ट पिलग्रिम’ अंतर्गत कोटय़वधी रुपयांची घोषणा झाली, मात्र हेसुद्धा पूर्ण झाले नाही. नुकतेच राज्यात सत्तांतर झाल्यावर मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी काशी कॉरिडॉरच्या धर्तीवर पंढरपूर कॉरिडॉरच्या माध्यमातून पंढरपूरच्या विकासाबाबत घोषणा केली.

काशी कॉरिडॉरच्या धर्तीवर पंढरपूर कॉरिडॉर करणार यामध्ये शहरातील रस्ते रुंदीकरण, घाट सुशोभीकरण , दर्शन रांग, मंदिर परिसर आणि प्रदक्षिणा मार्गावर रुंदीकरण आदी कामांचा समावेश आहे. मात्र या साऱ्या विकासकामाबाबत स्थानिक नागरिकांना ना प्रशासन विश्वासात घेते ना राजकारणी. त्यामुळे स्थानिक नागरिक, व्यापरी, वारकरी गोंधळून गेले आहेत. स्थानिकांचा विकासाला विरोध नाही. मात्र विश्वासात घेतले जात नसल्याच्या तक्रारी आहेत. त्याचबरोबर जे अधिकारी आहेत, तेसुद्धा मागील आराखडय़ात थोडा बदल सुचवून कागदे रंगवली जात असल्याचे स्थानिकांचा आरोप आहे. प्रमुख चार यात्रा, दर महिन्याची एकादशी , वर्षांतील सुट्टय़ा या काळात भाविक दर्शनासाठी पंढरीला येता. त्यात प्रमुख यात्रेत म्हणजेच आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री यात्रेला लाखो भाविक येतात. या चार यात्रेत प्रमुख दोन दिवशी पंढरीत लाखो भाविक असतात. एरवी भाविकांची संख्या हजारात असते. त्यामुळे पंढरपूरचा विकास म्हणजे गर्दी नियंत्रण, रस्ता रुंदीकरण, यासह इतर गोष्टींचा विचार प्रशासनाने केला पाहिजे.

वास्तविक पाहता वरील काही योजनेमधून शहरात काही विकास कामे झाली आणि कोटय़वधी रुपये खर्च झाले, मात्र ज्या गतीने विकास होणे गरजेचे होते ते झालेच नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रखडलेल्या विकासाला गती द्यावी अशी माफक अपेक्षा लाखो भाविकांसह स्थानिकांची आहे.

यात्रा कालावधीत होणाऱ्या गर्दीच्या नियंत्रणासाठी पिढय़ांपिढय़ा पंढरपूरमध्ये राहणाऱ्या नागरिकांना विस्थापित करणे हे चुकीचे आहे. स्थानिक नागरिकांनी याआधी झालेल्या रस्तारुंदीकरण व इतर विकास कामांना कधीच विरोध केलेला नाही. यापूर्वी विस्थापित झालेल्या नागरिकांचे पुनर्वसन नीट झालेले नाही. असे असताना हा नवीन विकास आराखडा तयार करण्यात आला असून त्यात कुठेही स्थानिक नागरिकांना विश्वासात घेतले गेले नाही. प्रशासनाने जर नागरिकांशी सुसंवाद करून बाधित होणाऱ्या लोकांच्या संपूर्ण पुनर्वसनाच्या संबधी योग्य भूमिका घेतली नाही तर मात्र नागरिकांमधून या आराखडय़ास मोठय़ा प्रमाणावर विरोध होईल.

– अ‍ॅड. ओंकार जोशी, सामाजिक कार्यकर्ते, पंढरपूर



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply