‘नॉट रिचेबल’ एकनाथ शिंदे गुजरातमध्ये? मध्यरात्रीनंतर सुप्रिया सुळे, जयंत पाटलांची ‘मातोश्री’ला भेट; सेना आमदारांच्या हॉटेलची सुरक्षा वाढवली

विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच शिवसेनेचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते एकनाथ शिंदे हे ‘नॉट रिचेबल’ असल्याची माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांच्याशी शिवसेनेकडून काल रात्रीपासूनच संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात असून त्यामध्ये सकाळी नऊ वाजेपर्यंत तरी यश आलेलं नाही. असं असतानाच आता एकनाथ शिंदे हे गुजरातमध्ये असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांनी दिल्या आहेत. मात्र एकनाथ शिंदे नेमके कुठे आहेत यासंदर्भातील ठोस माहिती समोर आलेली नाही.

एकनाथ शिंदे हे काल सायंकाळी विधान परिषदेचा निकाल लागण्याच्या आधीपासूनच शिवसेना नेत्यांच्या संपर्कात नसल्याचं सांगितलं जातंय. एकनाथ शिंदेंसोबत १३ आमदारही शिवसेनेच्या संपर्कात नसल्याची माहिती समोर येत आहेत. याच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्व शिवसेना आमदारांची मातोश्रीवर बैठक बोलावली आहे.

मतं फुटली…
शिवसेनेचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या १३ आमदारांसहीत विधान परिषदेच्या निकालानंतरपासून संपर्कात नसल्याने शिवसेनेची धाकधूक वाढलीय. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपाला राज्यसभेपेक्षाही दहा मतं अधिक मिळाल्याचं उघड झालं असून महाविकास आघाडीतील मित्रपक्षांची अनेक मतं फुटल्याचं यावरुन स्पष्ट झालंय. विशेष म्हणजे कालच्या निवडणुकीदरम्यान सचिन आहिर वगळता कोणीही प्रसारमाध्यमांशी चर्चा केली नाही. आमश्या पाडवी आणि आहिर वगळता कोणताही नेता प्रसारमाध्यमांसमोर आला नाही. त्यातच आता एकनाथ शिंदे आणि १३ आमदार पक्षाच्या संपर्कात नसल्याने शिवसेनेची चिंता वाढलीय.

शिंदे अलिप्त…
एकनाथ शिंदे हे विधान परिषदेच्या निवडणूक प्रक्रियेपासून ते निकालापर्यंत सर्वच गोष्टींपासून अलिप्त होते. ते सोमवारपासूनच नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. सोमवार सायंकाळपासूनच शिंदे आणि १३ आमदार नॉट रिचेबल असल्याचं समजल्यानंतर शिवसेनेच्या विजयी उमेदवारांच्या सेलिब्रेशनऐवजी बैठकीचे आदेश देण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेनेचे बरेचसे आमदार उपस्थित होते. ही बैठक रात्री दोन वाजेपर्यंत सुरु होती.

शिंदे गुजरातमध्ये? हॉटेलची सुरक्षा वाढवली…
मातोश्रीवरील या बैठकीच्या आधी आणि नंतरही शिंदेंना संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र शिंदेशी संपर्क होऊ शकलेला नाही. त्यातच आता त्यांच्या फोनवर कॉल केल्यावर गुजराती भाषेमध्ये मोबाईल सेवेची ट्यून ऐकू येत असल्याने ते गुजरातमध्ये असल्याची चर्चा सुरु झाली असून काही वृत्तवाहिन्यांनी तसे वृत्तांकन केलं आहे. असं असलं तरीही शिंदे नेमके कुठे आहेत याची माहिती मिळालेली नाही. काल रात्रीपासूनच शिवसेनेचे आमदार वास्तव्यास असलेल्या ला मेरिडीअन हॉटेलची सुरक्षा वाढवण्यात आल्याचेही वृत्त आहे.

सुप्रिया सुळे आणि जयंत पाटलांनी घेतली भेट
दरम्यान, एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार हे नॉट रिचेबल असल्यासंदर्भातील माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी वर्षा बंगल्यावर जाऊ उद्धव यांची भेट घेतल्याची माहितीही समोर येत आहे. अशातच आज दुपारी १२ वाजता उद्धव ठाकरेंनी सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला तरी एकनाथ शिंदे उपस्थित राहतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सर्व आमदारांनी या बैठकीला उपस्थित रहावे असे स्पष्ट निर्देश ‘मातोश्री’वरुन देण्यात आले आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply