नाशिक :  भररस्त्यात धावती शिवशाही बस पेटली, नाशिक-औरंगाबाद मार्गावरील थरारक घटना

नाशिक : औरंगाबादहून नाशिकच्या दिशेने निघालेल्या शिवशाही बसला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. माहितीनुसार निफाड तालुक्यातील बोकडदरे परिसरात ही घटना घडली आहे. आगीत शिवशाही बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. सुदैवाने या कुठलीही जीवितहानी झाली नाही. बसने पेट घेतल्याचे लक्षात येताच चालक आणि वाहकाने प्रसंगावधान राखत बसमधून उडी घेतल्यानं जीवितहानी टळली.

मिळालेल्या माहितीनुसार ही बस औरंगाबादहून नाशिकच्या दिशेने येत होती. यावेळी बसमध्या १२ ते १५ प्रवासी प्रवास करत होते. मात्र, वाटेतच बस नादुरुस्त झाल्याने बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसवून देण्यात आले. त्यानंतर नादुरुस्त झालेली बस घेऊन चालक आणि वाहक नाशिकच्या दिशेने येत असताना बोकडदरेजवळ बसने अचानक पेट घेतला. बसने पेट घेतल्याचे लक्षात येताच चालक आणि वाहकाने प्रसंगावधान राखत बस रस्त्याच्या कडेला लावत उडी घेतली.

दरम्यान, बसला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. मात्र आग आटोक्यात येईपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली. बसला नेमकी आग कशामुळे लागली याचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. प्राथामिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असा अंदाज आहे. या घटनेचा पुढील तपास निफाड पोलीस करत आहे.

शिवशाही बसला आग लागण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील राज्यात अशा घटना घडल्या आहेत. गेल्या महिन्यातही सांगलीहून पुण्याच्या दिशेने येत असलेल्या शिवशाही बसला आग लागली होती. त्यावेळी चालकाने प्रसंगावधान दाखवत बस कडेला लावत प्रवाशांना बसमधून खाली उतरण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यावेळी बसमध्ये ४० प्रवाशी होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply