नारायणगाव : इच्छेविरुद्ध लग्न, पतीपासून सुटकेसाठी दोन वर्षांनी विवाहितेचं अपहरणनाट्य

नारायणगाव : येथील वैदवस्ती (ता. जुन्नर) येथून बेपत्ता झालेल्या व नारायणगाव  पोलीस ठाण्यात अपहरणाचा  गुन्हा दाखल असलेल्या विवाहित महिलेचाशोध लावण्यात नारायणगाव पोलिसांना यश आले आहे. सदर विवाहित महिला व दोन तरुणांना नारायणगाव पोलिसांनी नगर येथून ताब्यात घेतले आहे. या अपहरणनाट्याचा छडा नारायणगाव पोलिसांनी चार तासात लावला. या प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी विवाहिता शितल मयुर शिंदे( वय २४, राहणार वैदवस्ती,नारायणगाव), महेश लोखंडे , राहूल कनगरे ( दोघेही राहणार राहूरी) यांना ताब्यात घेतले आहे.आशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

वैदवस्ती येथील शितल शिंदे या विवाहित महिलेला ६ एप्रिल रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी येथील नारायणगाव -जुन्नर रस्त्यावर मोटारीत जबरदस्तीने बसवून पळवून नेले असल्याची तक्रार विवाहितेचा पती मयूर गोविंद शिंदे यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.या घटनेचे गांभीर्य विचारात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे ,सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दुर्वे, सचिन कोबल, शैलेश वाघमारे, दिनेश साबळे, दिपक साबळे, होमगार्ड अक्षय ढोबळे यांच्या पथकाने तातडीने तपास सुरू केला.

अपहरणासाठी एम एच ०४ डीडब्ल्यू ६८७३ या वाहनाचा वापर केला असल्याचे सीसीटीव्हीच्या आधारे निष्पन्न झाले. मोटारीच्या नंबर वरून वाहनाचा मूळ मालक नगर येथील असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी नगर येथे जाऊन वाहनाच्या मूळ मालकाकडे चौकशी केली असता महेश लोखंडे व राहूल कनगरे हे माझी मोटार घेऊन गेले असून सायंकाळी पाच वाजता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस पथकाने सापळा रचून मोटारीसह शितल मयुर शिंदे, महेश लोखंडे , राहूल कनगरे यांना सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास नगर येथून ताब्यात घेतले. चौकशीत अपहरण नसून अपहरणनाट्य असल्याचे निष्पन्न झाले. राहुरी येथील शितल हीचा विवाह दोन वर्षा पूर्वी तिच्या इच्छेविरुद्ध मयुर शिंदे याच्याशी झाला होता.या मुळे शितल तीचे मित्र महेश लोखंडे , राहूल कनगरे यांच्या सोबत सहा मार्च रोजी दुपारी एक वाजता निघून गेली होती.अपहरण झाल्याचा बनाव शितल व तीचे मित्र महेश लोखंडे , राहूल कनगरे यांनी संगनमताने केला होता. या संवेदनशील प्रकरणाचा तपास तातडीने करून पोलिसांनी सत्य उघडकीस आणल्याने नारायणगाव परिसरात चर्चा सुरू असलेल्या या अपहरणनाट्यावर अखेर पडदा पडला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply