नवी मुंबई : नोंदणी करुन झाली दहा वर्षे ! इमारतींचा मात्र पत्ता नाही?

खारघर : नावाजलेला बिल्डर म्‍हणून घरांची नोंदणी केली. नोंदणी करून दहा वर्षे झाली. दर महिन्याला घरांचे हप्ते जात आहेत; मात्र इमारती कुठे आहेत, किती टक्के बांधकाम झाले, घरांचा ताबा  कधी मिळणार, यासंदर्भात विचारणा करूनही बिल्‍डरकडून योग्‍य माहिती दिली जात नसल्‍याने संतप्त सदनिकाधारकांनी बिल्डरच्या कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करून निषेध नोंदवला.

तळोजा परिसरातील खुटारी गावालगत असलेल्या एमएमआरडीए जागेवर अधिराज बिल्डरकडून ४५ ते ५० माळ्यांचा टॉवर उभारण्यात येणार आहे. इमारतीत प्रशस्त घरे, स्वीमिंग पूल, व्यायामशाळा, योगा केंद्र, मार्केट, मैदान आणि इमारतीपासून खारघर रेल्वे स्थानकापर्यंत बस सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची जाहिरात २०१० मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामुळे नवी मुंबई, पनवेल, ठाणे आणि मुंबई आदी परिसरातील नागरिकांनी अधिराज हे नावाजलेले बिल्डरकडे घरांसाठी नोंदणी केली. प्रकल्‍पालगतच नवी मुंबई मेट्रोचे अमनदूत मेट्रो स्थानक तसेच हाकेच्या अंतरावर पनवेल-मुंब्रा महामार्ग असल्यामुळे नागरिकांनी घराचे बुकिंग केले.

दोन वर्षांत घरे उपलब्ध करून दिली जातील, असे सांगण्यात आले होते; मात्र नोंदणीकृत सदनिकाधारक कार्यालयात जाऊन विचारणा करू लागल्‍यावर सुरुवातीला लवकरच घरे दिली जातील, असे सांगण्यात आले. यालाही तब्‍बल दहा वर्षे झाली आहेत. रविवार खुटारी गावालगत अधिराज बिल्डरच्या कार्यालयात धाव घेत सदनिकाधारकांनी जोरदार घोषणाबाजी करीत निषेध नोंदवला; मात्र या वेळी कार्यालयात वरिष्ठ अधिकारी उपस्थित नव्हता. जोपर्यंत योग्य माहिती देत नाही, तोपर्यंत घरी माघारी जाणार नाही, अशी भूमिका घेत लहान मुलासह महिला आणि नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply