नवी दिल्ली : शिंदे गटाला ‘एनडीए’मध्ये स्थान?; भाजपला शिवसेनेच्या खासदारांची प्रतीक्षा

नवी दिल्ली: भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) बुधवारी झालेल्या बैठकीत शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर उपस्थित राहिल्यानंतर, शिंदे गटाला अधिकृतपणे ‘एनडीए’मध्ये स्थान देण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. मात्र, शिवसेनेचे खासदार शिंदे गटात येण्याची भाजप प्रतीक्षा करत आहे.

शिवसेनेचे खासदार भाजपला पाठिंबा देतील, तेव्हा शिंदे गट ‘’एनडीए’’मध्ये सहभागी झाला असे म्हणता येईल, असा युक्तिवाद केसरकर यांनी बुधवारी केला. शिवसेनेच्या बहुतांश खासदारांनी मुर्मूना पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्यानंतर, शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाही मुर्मूना पाठिंबा देत असल्याची घोषणा केली.

सध्या शिवसेना ना ‘एनडीए’चा घटक पक्ष आहे, ना काँग्रेसच्या ‘यूपीए’ (संयुक्त पुरोगामी आघाडी) आघाडीचा.  शिंदे गटातील ५० आमदारांनी ‘’एनडीए’’चे राष्ट्रपती पदाचे उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. दिल्लीमध्ये भाजपच्या मुख्यालयात बुधवारी झालेल्या ‘’एनडीए’’च्या बैठकीत सहभागी होण्याचे शिंदे गटालाही निमंत्रण देण्यात आले होते. शिंदे गटाचे प्रवक्ता दीपक केसरकर या बैठकीला उपस्थित होते.

शिवसेनेच्या आमदारांप्रमाणे खासदारही शिंदे गटात सहभागी होतील असा भाजपचा कयास आहे. शिवाय, शिवसेनेचे नगरसेवकच नव्हे तर, शाखा आणि जिल्हाप्रमुखही शिंदे गटात सामील होतील. शिवसेनेत फूट पडल्यानंतर खरी शिवसेना कोणाची याचा निकाल लागेल. त्यानंतर, शिंदे गटाला अधिकृतपणे ‘’एनडीए’’मध्ये स्थान दिले जाऊ शकेल. शिवसेनेमुळे रिक्त झालेले मंत्रीपदही शिंदे गटाला दिले जाऊ शकेल, असे भाजपमधील सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, ‘’उद्धव ठाकरे यांच्या मूळ शिवसेनेला आमच्याकडे यावे लागेल. तसे झाले तर पुन्हा शिवसेनेशी भाजप युती करू शकेल. मग, ही शिवसेना ‘’एनडीए’’चा घटक पक्ष बनू शकेल’’, असे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता प्रेम शुक्ला यांनी सांगितले. ‘’ महाविकास आघाडी करून शिवसेना पक्ष संपू लागली होती, असे आमदारांना, खासदारांना वाटते. जेव्हा शाखाप्रमुखांपासून जिल्हाप्रमुखांपर्यंत शिवसेनेच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा अवलंब करावा असे वाटेल, तेव्हा कुटुंबप्रमुख म्हणून शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरेसुद्धा ऐकतील’’, असा दावा केसरकर यांनी केला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply