नवी दिल्ली :नितीन गडकरी यांची टोलनाक्यांबाबत महत्त्वाची घोषणा; ‘आता ६० किमी अंतरात फक्त…’

नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी टोलनाक्यांबाबत मोठी घोषणा केली आहे. आता ६० किलोमीटर अंतरात एकच टोलनाका राहणार असून त्याबाबतची माहिती गडकरी यांनी लोकसभेत दिली.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाच्या अनुदानाच्या मागण्यांवर लोकसभेत विक्रमी अशी ११ तास चर्चा झाली. या चर्चेला उत्तर देताना गडकरी यांनी वरील घोषणा केली. राष्ट्रीय महामार्गांवर ६० किमी अंतरात एकच टोलनाका असेल, असा शब्द मी देतो. आत्ताच्या स्थितीत या अंतरात जर दुसरा टोलनाका असेल तर येत्या तीन महिन्यांत त्या अंतरात एकच टोलनाका राहील, याची काळजी घेतली जाईल, असे ते म्हणाले. टोलनाक्यांच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांना आधार कार्डाच्या साह्याने पास मिळायला हवेत, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

नितीन गडकरी यांनी रस्ते अपघातांबाबत चिंताजनक अशी आकडेवारी सभागृहात मांडली. जगभरात होणाऱ्या एकूण रस्ते अपघातांपैकी ११ टक्के अपघात भारतात होतात. वर्षभरात सरासरी ५ लाख लोक रस्ते अपघाताचे शिकार ठरतात. यात दीड लाख लोकांचा मृत्यू होतो. हे प्रमाण कमी करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील आणि त्यादिशेने आम्ही पावले टाकत आहोत, असे गडकरी म्हणाले. सरकारने सध्या रस्ते सुरक्षेवर भर दिला असून देशात आता कोणत्याही कारची निर्मिती झाली तर त्यात एअरबॅग अनिवार्य करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. गडकरी यांनी सभागृहात रस्ते विकासाचा रोडमॅपही सादर केला. देशात २०२४ वर्ष अखेरपर्यंत अमेरिकेसारखे रस्त्यांचे जाळे आपणास दिसेल, अशा शब्दांत गडकरी यांनी देशवासीयांना आश्वस्त केले. प्रगतीपथावरील अनेक कामांचा लेखाजोखाही त्यांनी मांडला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply