नवी दिल्ली : दिल्ली पालिकेत ‘आप’ची सत्ता; भाजपची १५ वर्षांची राजवट संपुष्टात, काँग्रेस आणखी क्षीण

नवी दिल्ली : भाजपचे १५ वर्षांचे राज्य खालसा करून आम आदमी पक्षाने (आप) दिल्ली महापालिका ताब्यात घेतली. ‘आप’ला एकतर्फी यश मिळाले नसले तरी, २५० प्रभागांपैकी १३४ प्रभाग जिंकून बहुमताचा आकडा पार केला. ‘आप’विरोधातील थेट लढतीत भाजपला १०४ प्रभागांमध्ये विजय मिळाला. काँग्रेस आणखी क्षीण झाला असून फक्त ९ प्रभाग मिळवून हा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर राहिला.

२०१७ मध्ये तीन महापालिका मिळून २७५ प्रभाग होते. केंद्र सरकारने संसदेमध्ये कायदादुरुस्ती करून महापालिकांचे विलीनीकरण केले. फेररचनेनंतर प्रभागांची संख्याही २५० पर्यंत खाली आणली. २०१७ च्या तुलनेत या वेळी ‘आप’ला ९० जागा जास्त मिळाल्या आहेत. भाजपच्या ६४ जागा कमी झाल्या असून काँग्रेसच्याही १९ जागांमध्ये घट झाली आहे. गेल्या २४ वर्षांमध्ये भाजपला दिल्ली राज्याची सत्ता मिळालेली नाही. २०१५ मधील विधानसभा निवडणुकीत ‘आप’ने ७० पैकी ६७ जागा जिंकून भाजपला पराभूत केले होते, तरीही, दोन वर्षांनंतर २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत मात्र भाजपने सत्ता राखली होती. २०२० मधील विधानसभा निवडणुकीतील यशानंतर, दिल्ली महापालिकाही ‘आप’ जिंकेल असा कयास व्यक्त होत होता.

भाजपने दिल्ली सरकारमधील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा सातत्याने मांडला. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर उत्पादन शुल्क घोटाळय़ाचा आरोप केला. केजरीवाल व सिसोदिया यांनी मद्यधोरण बदलून पैसा कमावल्याचाही दावा भाजपने केला. तिहार तुरुंगात असलेले आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन मौजमजा करत असल्याचा दावा करणाऱ्या चित्रफिती ‘लीक’ केल्याचा आरोप ‘आप’ने केला होता. मात्र, ‘आप’च्या कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा मतदारांना पटवून देण्यात भाजप नेते अपयशी ठरले. तरीही, भाजपने १०० प्रभाग जिंकल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

प्रचाराचा फौजफाटा प्रभावहीन

भाजपने डझनहून अधिक केंद्रीय मंत्री, भाजपचे ६ मुख्यमंत्री, ७ खासदार, शंभराहून अधिक पदाधिकारी हा प्रचारातील फौजफाटा तुलनेत प्रभावहीन ठरला. पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, पीयूष गोयल, हरदीप सिंग पुरी, मीनाक्षी लेखी, अनुराग ठाकूर, ज्योतिरादित्य शिंदे, नितीन गडकरी, भागवत कराड असे सुमारे दीड डझन मंत्री वॉर्डा-वॉर्डात जाऊन मतांचा जोगवा मागत होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही दिल्लीत प्रचार केला होता. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा-शर्मा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांची भाषणे-रोड शो झाले. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्यासह दिल्लीतील भाजपचे सर्व म्हणजे सातही खासदार दिवसरात्र घरोघरी जाऊन ‘डबल इंजिन’चा मुद्दा मतदारांना पटवून देत होते. भाजपचे राष्ट्रीय महासचिव, राष्ट्रीय सचिव, माजी केंद्रीय मंत्री, दिल्लीतील भाजपचे नेते, केंद्रीय तसेच राज्य भाजपचे शेकडो पदाधिकारीही प्रचार करत होते.

भाजपला भ्रष्टाचार भोवला?

भाजपच्या नगरसेवकांच्या भ्रष्टाचाराबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त होत होती. प्रशासकीय गोंधळ, नव्या स्थानिक नेतृत्वाचा अभाव, अरविंद केजरीवाल यांना आव्हान देऊ शकणाऱ्या प्रदेश भाजप नेत्यांची वानवा अशा प्रमुख मुद्दय़ांमुळे दिल्लीकर मतदारांचा कौल ‘आप’कडे असल्याचे दिसू लागले होते. कचरा समस्या, रस्त्यांची-बागांची दुरवस्था, दिल्लीतील वाढता बकालपणा असे दैनंदिन मुद्दे ‘आप’ने प्रचारात प्रामुख्याने मांडले होते. ‘आप’च्या आरोपांना भाजपला तोडीस तोड प्रत्युत्तर देता आले नाही.

‘आप’चे ‘डबल इंजिन’

दिल्लीमध्ये पहिल्यांदाच ‘डबल इंजिन’ सरकार आले असून राज्य सरकारबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थेमध्येही ‘आप’ची सत्ता स्थापन झाली आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून भाजपचे तमाम नेते ‘डबल इंजिन’चा प्रचार करत असतात. यावेळी प्रथमच आम आदमी पार्टीलाही ही संधी मिळाली आहे.

दिल्लीकरांना सोयीसुविधा पुरवण्यासाठी आता केंद्र सरकारची मदत लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्राचे आशीर्वाद हवे आहेत. मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. दिल्लीचा विकास करण्यासाठी सर्व पक्षांचे सहकार्य अपेक्षित आहे.

– अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री, दिल्ली

गुजरात, हिमाचलचे निकाल आज

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी होणार आहे. गुजरातमध्ये सत्ताधारी भाजपसमोर काँग्रेस आणि ‘आप’चे आव्हान असले तरी मतदानोत्तर चाचण्यांमध्ये भाजप पुन्हा एकदा सत्तेत येण्याचे संकेत आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये मात्र भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीचा सामना असून काँग्रेस सत्तांतर घडवणार का, याची उत्सुकता असेल. या दोन राज्यांसह उत्तर प्रदेशातील मैनपुरी लोकसभा मतदारसंघ आणि विविध राज्यांमधील सहा विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीची मतमोजणीही गुरुवारी होणार आहे.

आप : १३४

भाजप : १०४

काँग्रेस : ९

अन्य : ३

एकूण : २५०

बहुमताचा आकडा : १२६



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply